पुणे विषारी मद्यप्रकरणानंतर अमळनेर-पारोळ्यात उत्पादन शुल्क विभागाचा धडक छापा; ३.७७ लाखांचा मुद्देमाल जप्त….

---Advertisement---

 

पुण्यातील विषारी मद्यप्रकरणाच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने जळगाव जिल्ह्यात अवैध मद्यनिर्मिती आणि वाहतुकीविरोधात विशेष मोहीम हाती घेत मोठी कारवाई केली. अमळनेर तालुक्यातील गांधली, नांदेड तसेच पारोळा तालुक्यातील चिखलोद आणि शेडावे परिसरातील हातभट्टी निर्मिती केंद्रांवर छापे टाकण्यात आले. यावेळी ताडीची अवैध वाहतूक करणाऱ्यांवरही कारवाई करण्यात आली.

या मोहिमेदरम्यान महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ अंतर्गत गुन्हे नोंदविण्यात आले. कारवाईत ६ हजार ६० लिटर रसायन, १९४ लिटर ताडी, १०० लिटर गावठी दारू आणि एक मोटारसायकल असा एकूण ३ लाख ७६ हजार ९४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, जप्त करण्यात आलेले रसायन मानवी आरोग्यासाठी घातक असून त्याची वाहतूक करणेही धोकादायक होते. त्यामुळे ते घटनास्थळीच नष्ट करण्यात आले.

पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, पारोळा तालुक्यातील चिखलोद आणि शेडावे परिसरात तयार होणारी अवैध दारू अमळनेर शहरातील पैलाड भागात पुरविली जात असल्याची गुप्त माहिती विभागाला मिळाली होती. त्यानंतर नियोजनबद्ध पद्धतीने ही कारवाई करण्यात आली.

पुण्यातील मद्यप्रकरणानंतर राज्यभरात अवैध मद्यनिर्मिती व विक्रीवर विशेष लक्ष ठेवण्यात येत असून त्याच मोहिमेअंतर्गत अमळनेर आणि पारोळा तालुक्यात ही धडक कारवाई करण्यात आल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे.

ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे जळगाव जिल्हा अधीक्षक व्ही. टी. भुकन यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यामध्ये निरीक्षक कय्युम मोमीन, आर. के. फुसे, गोपाल मोरे यांच्यासह पथकातील कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. प्रकरणाचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक गोपाल मोरे करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---