---Advertisement---
कासोदा येथे गाजलेल्या कथित गुप्तधन प्रकरणात एरंडोल न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय देत मधुकर भगीरथ समदाणीसह सर्व आरोपींना निर्दोष मुक्त केले आहे. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी फौजदारी खटला क्रमांक ९१/२०२२ मध्ये हा निकाल दिला असून साडेतीन वर्षांपासून चर्चेत असलेल्या प्रकरणाचा अखेर पडदा पडला आहे.
या प्रकरणाची सुरुवात १ जानेवारी २०२२ रोजी झाली होती. कासोदा येथील समदाणी गल्लीतील एका जुन्या घराच्या भिंती पाडून माती वाहून नेत असताना कथित गुप्तधन सापडल्याची चर्चा परिसरात पसरली होती. त्यानंतर राजेश गजानन मंडोरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सोन्या-चांदीचे दागिने, शिक्के आणि इतर मौल्यवान वस्तूंची चोरी झाल्याचा आरोप करण्यात आला होता. या कथित गुप्तधनाची किंमत सुमारे २० लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले होते.
या प्रकरणात मधुकर समदाणी, युगल समदाणी, जितेंद्र यादव, ज्ञानेश्वर मराठे, संजय उर्फ सतीश पाटील, राहुल भिल, लहू पाटील, स्वप्नील पाटील तसेच संबंधित कामगार व यंत्रचालकांविरुद्ध भारतीय दंड संहितेतील विविध कलमांसह भारतीय गुप्तधन अधिनियम १८७८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सरकारी पक्षाच्या मते आरोपींनी संगनमत करून संबंधित घरात अनधिकृत प्रवेश केला आणि जेसीबी व ट्रॅक्टरच्या सहाय्याने भिंती पाडून कथित गुप्तधन लंपास केले. मात्र सुनावणीदरम्यान या आरोपांना पुष्टी देणारे ठोस आणि विश्वासार्ह पुरावे सादर करण्यात अभियोजन पक्षाला यश आले नाही.
न्यायालयाने आपल्या निकालात आरोपींविरुद्धचा संशय पुरेशा पुराव्यांअभावी सिद्ध होत नसल्याचे नमूद केले. त्यामुळे सर्व आरोपींना निर्दोष मुक्त करण्याचा निर्णय देण्यात आला.
दरम्यान, या प्रकरणात जप्त करण्यात आलेल्या कथित गुप्तधनाचा मुद्देमाल सध्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ताब्यात असल्याची माहिती समोर आली आहे. आरोपींच्या बाजूने ॲड. आल्हाद काळे, ॲड. अजिंक्य काळे, ॲड. जयेश पिलोरे आणि ॲड. शुभम समदाणी यांनी न्यायालयीन कामकाज पाहिले.









