---Advertisement---
नायजरमध्ये सहारा वाळवंटात उष्माघात आणि पाणी मिळाल्याने एका हृदयद्रावक घटनेत ४९ प्रवाशांना जीव गमवावा लागला आहे. अत्यंत उष्ण हवामान, पाण्याचा तुटवडा आणि मदत वेळेत न मिळाल्याने या प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने दिली आहे. या दुर्घटनेत दोन जण मात्र थोडक्यात बचावले.
या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मृत्यूमुखी पडलेले सर्व प्रवासी माली येथे एका धार्मिक कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर परतीच्या प्रवासाला निघाले होते. प्रवासादरम्यान त्यांचा ट्रक नायजरमधील अगादेज प्रदेशातील दुर्गम भागात अचानक बंद पडला. हा परिसर अस्सामाका या सीमावर्ती गावापासून सुमारे ८० किलोमीटर अंतरावर असून नायजर, अल्जीरिया आणि मालीच्या सीमेजवळ आहे.
वाहन बंद पडताच चालक आणि इतरांनी ते दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सर्व प्रयत्न निष्फळ ठरले. दरम्यान, वाहनातील पिण्याचे पाणी संपले. सभोवताली कोणतीही वस्ती, मदतीची साधने किंवा पाण्याचा स्रोत नसल्याने प्रवासी अडचणीत सापडले. वाढत्या तापमानात आणि तीव्र तहानेमुळे एकामागोमाग एक जण बळी पडत गेले.
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, मृतांची सामूहिक दफनभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. या दुर्दैवी घटनेतून दोन प्रवासी जिवंत बाहेर पडण्यात यशस्वी ठरले. त्यांनी प्रखर उन्हाचा सामना करत ५० किलोमीटरहून अधिक अंतर पायी पार केले आणि अखेरीस एका पाण्याच्या ठिकाणी पोहोचले. त्यानंतर ते अस्सामाकापर्यंत पोहोचले आणि त्यांनीच प्रशासनाला दुर्घटनेची माहिती दिली.
हा भाग आफ्रिकेतील विविध देशांमधून स्थलांतर करणाऱ्या लोकांसाठी महत्त्वाचा मार्ग मानला जातो. मात्र, कठीण हवामान, लांब अंतर आणि मूलभूत सुविधांचा अभाव यामुळे या मार्गावर यापूर्वीही अनेकांनी जीव गमावल्याच्या घटना घडल्या आहेत.









