पत्नीचे खासगी फोटो-व्हिडीओ पतीने केले सोशल मीडियावर व्हायरल; संशयातून नवऱ्याने ओलांडल्या सर्व मर्यादा….!

---Advertisement---

 

पत्नीवर संशय घेत एका व्यक्तीने तिचे खासगी फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केल्याची धक्कादायक घटना घडली असून बिहारमधील कटिहार जिल्ह्यातली हि एक धक्कादायक आणि संतापजनक घटना आहे. या प्रकरणी सायबर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

आरोपीचे लग्न २०२३ मध्ये झाले होते. लग्नानंतर त्याला पत्नीच्या वागणुकीबाबत संशय येऊ लागला. पत्नी माहेरी गेली किंवा फोन उशिरा उचलला तरी तो तिच्यावर संशय व्यक्त करत असे. कालांतराने या संशयामुळे पती-पत्नीच्या नात्यात दुरावा निर्माण झाला आणि दोघांमध्ये वारंवार वाद होऊ लागले.

पत्नीला बदनाम करण्याच्या उद्देशाने आरोपीने तिचे खासगी फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसारित करण्यास सुरुवात केल्याचा आरोप आहे. संबंधित सामग्री व्हायरल झाल्यानंतर पत्नीला याची माहिती मिळाली आणि तिने सायबर पोलिसांकडे धाव घेतली.

९ जानेवारी २०२६ रोजी दाखल केलेल्या तक्रारीत पीडित महिलेने आरोप केला की तिचा पती तिच्या परवानगीशिवाय खाजगी फोटो आणि व्हिडीओ इंटरनेटवर शेअर करत आहे. तक्रारीनंतर सायबर पोलिसांनी डिजिटल पुराव्यांच्या आधारे तपास सुरू केला.

तपासादरम्यान आरोपी काही काळ पोलिसांच्या हाती लागत नव्हता. मात्र, तांत्रिक तपास आणि डिजिटल ट्रॅकिंगच्या मदतीने अखेर त्याला अटक करण्यात आली. चौकशीदरम्यान आरोपीने सोशल मीडियावर संबंधित सामग्री अपलोड केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

कटिहार सायबर विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, कोणत्याही व्यक्तीचे खासगी फोटो किंवा व्हिडीओ त्यांच्या संमतीशिवाय प्रसारित करणे हा गंभीर आणि दंडनीय गुन्हा आहे. वैवाहिक नाते असले तरी एखाद्याच्या गोपनीयतेचा भंग करण्याचा अधिकार कोणालाही नाही.

पोलिसांनी आरोपीचा मोबाईल जप्त केला असून त्यामधील डिजिटल सामग्रीची फॉरेन्सिक तपासणी केली जात आहे. या प्रकरणामुळे सोशल मीडियाचा गैरवापर आणि वैयक्तिक गोपनीयतेचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---