---Advertisement---
देशातील सुमारे 7 कोटी भविष्य निर्वाह निधी (PF) खातेदारांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. आर्थिक वर्ष 2025-26 साठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) निश्चित केलेल्या 8.25 टक्के व्याजदराला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. या निर्णयानंतर लवकरच खातेदारांच्या पीएफ खात्यात व्याजाची रक्कम जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय वित्त मंत्रालयाने ईपीएफओच्या प्रस्तावाला हिरवा कंदील दिला आहे. यापूर्वी 2 मार्च 2026 रोजी झालेल्या केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या (CBT) बैठकीत 2025-26 या आर्थिक वर्षासाठी 8.25 टक्के व्याजदर कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. केंद्रीय कामगार व रोजगार मंत्री मनसुख मांडवीय यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीनंतर हा प्रस्ताव मंजुरीसाठी वित्त मंत्रालयाकडे पाठविण्यात आला होता.
सरकारची मंजुरी मिळाल्यानंतर आता ईपीएफओकडून सदस्यांच्या खात्यात व्याज जमा करण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, चालू महिन्यातच ही रक्कम खात्यांमध्ये जमा होण्याची शक्यता आहे. व्याजाची रक्कम थेट सदस्यांच्या पीएफ खात्यात जमा केली जाईल.
ईपीएफ योजनेच्या नियमांनुसार, खातेदारांच्या वर्षभरातील मासिक शिल्लक रकमेच्या आधारे व्याजाची गणना केली जाते. आर्थिक वर्ष संपल्यानंतर त्या वर्षासाठी निश्चित करण्यात आलेल्या व्याजदरानुसार खात्यात रक्कम जमा केली जाते. जर एखाद्या सदस्याने वर्षभरात काही रक्कम काढली असेल, तर उर्वरित शिल्लक रकमेवरच व्याज दिले जाते.
दरम्यान, ईपीएफओ आपल्या कार्यपद्धतीत मोठे बदल करण्याच्या तयारीत आहे. सदस्यांना अधिक सुलभ आणि जलद सेवा देण्यासाठी अनेक सुविधा डिजिटल करण्यात येणार आहेत. भविष्यात पीएफ खात्यातील रक्कम एटीएम कार्ड किंवा यूपीआयच्या माध्यमातून काढण्याची सुविधा उपलब्ध होण्याची शक्यता आहे. तसेच दावे, पडताळणी आणि इतर सेवा अधिक वेगाने मिळण्यासाठी तांत्रिक सुधारणा करण्यात येत आहेत.
गेल्या काही वर्षांतील पीएफ व्याजदर पाहता, आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये 8.25 टक्के व्याजदर लागू होता. त्याआधी 2023-24 मध्येही 8.25 टक्के दर कायम ठेवण्यात आला होता. 2022-23 मध्ये हा दर 8.15 टक्के होता. 2021-22 मध्ये तो 8.10 टक्क्यांवर घसरला होता, तर 2020-21 मध्ये खातेदारांना 8.50 टक्के व्याज मिळाले होते.
देशातील कोट्यवधी कर्मचारी आणि निवृत्ती नियोजन करणाऱ्या नागरिकांसाठी पीएफ हा सुरक्षित गुंतवणुकीचा महत्त्वाचा पर्याय मानला जातो. त्यामुळे व्याजदर कायम राहणे आणि लवकरच खात्यात व्याज जमा होणार असल्याची बातमी खातेदारांसाठी दिलासादायक ठरत आहे.









