---Advertisement---
नशिराबाद येथील रहिवासी पवन सुनील पाटील (वय 28) यांचा मुंबईतील वसई परिसरात बहुमजली इमारतीवरून पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे नशिराबादसह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून नातेवाईक, मित्रपरिवार आणि ग्रामस्थांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.
पवन पाटील हे काही दिवसांपूर्वी मित्रांसोबत मुंबई येथे गेले होते. शुक्रवारी सकाळी वसई पश्चिम परिसरातील एका बहुमजली इमारतीवरून पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.
यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला. या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून मृत्यूमागील नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू आहे.
दिवंगत पवन पाटील हे नशिराबादचे लोकनियुक्त नगराध्यक्ष योगेश पाटील यांचे पुतणे तसेच त्रिमूर्ती हॉटेलचे संचालक अनिल मिठाराम पाटील यांचे पुतणे होते. शांत, मनमिळावू आणि सर्वांशी प्रेमाने वागणारा युवक म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनाची बातमी गावात पोहोचताच नातेवाईक, मित्रपरिवार आणि ग्रामस्थांमध्ये शोककळा पसरली. अनेकांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देत कुटुंबीयांचे सांत्वन केले.
पवन पाटील यांचे पार्थिव जळगाव येथील अयोध्या नगरमधील राहत्या घरी आणण्यात आले. शुक्रवारी सायंकाळी 8 वाजता अत्यंत शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई-वडील, भाऊ, नातेवाईक आणि मोठा मित्रपरिवार असा परिवार आहे.









