---Advertisement---
एरंडोल शहरात भरधाव ट्रकच्या धडकेत 36 वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. हा अपघात पंचायत समिती कार्यालयासमोर म्हसावद-नेरी रस्त्यावर दुपारी सुमारे दीड वाजेच्या सुमारास घडला. अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की मृत युवकाच्या डोक्यावरून ट्रक गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
एरंडोल शहरात गांधीपुरा परिसरातील फकीरवाडा येथील रहिवासी मुस्तकीम शहा रशीद शहा (वय 36) हे दुचाकीवरून घरी जात होते. पंचायत समितीसमोरील टेनिस क्लबजवळ ते मोटारसायकल रस्त्याच्या कडेला उभे असताना म्हसावदच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकने त्यांना जोरदार धडक दिली.
अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी तातडीने त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मृत मुस्तकीम शहा हे मोलमजुरी तसेच वाद्य वाजविण्याचे काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. त्यांच्या पश्चात वृद्ध आई, पत्नी आणि दोन लहान मुली असा परिवार आहे. कुटुंबाचा प्रमुख आधार हरपल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.
या प्रकरणी संबंधित ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची सूत्रे हवालदार दत्तात्रय ठाकरे यांनी हाती घेतली आहेत.
म्हसावद रस्त्यावर वाढत्या वाहतुकीमुळे आणि रस्त्यालगत उभ्या राहणाऱ्या वाहनांमुळे वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनत आहे. धरणगाव चौफुली ते म्हसावद नाका या मार्गावर अनेक ठिकाणी अतिक्रमण आणि अव्यवस्थित पार्किंगमुळे अपघाताचा धोका वाढल्याची नागरिकांची तक्रार आहे. भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलावीत, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.









