नाशिकमध्ये महायुतीला मोठा धक्का, बंडखोर अपक्ष गोकुळ गीते विजयी, नरेंद्र दराडेंचा दारुण पराभव….

---Advertisement---

 

नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत मोठा राजकीय उलटफेर पाहायला मिळाला आहे. महायुतीच्या अधिकृत उमेदवाराला मागे टाकत अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी विजय मिळवला असून अधिकृत घोषणेची केवळ औपचारिकता शिल्लक असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

या निवडणुकीकडे राज्याचे विशेष लक्ष लागले होते. कारण उमेदवारीच्या टप्प्यापासूनच नाशिकमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला होता. मतदानानंतरही निकालाबाबत उत्सुकता कायम होती. अखेर मतमोजणीअंती गोकुळ गीते यांनी बाजी मारल्याचे स्पष्ट झाले.

मतमोजणीदरम्यान गोकुळ गीते यांना एकूण ३८९ मते मिळाल्याचे समोर आले. निकालाची माहिती मिळताच त्यांच्या समर्थकांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात जल्लोष सुरू केला. विविध घोषणांनी परिसर दणाणून गेला असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

या मतदारसंघात महायुतीकडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नरेंद्र दराडे हे अधिकृत उमेदवार होते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या १७ जागांसाठी महायुतीने एकत्रितपणे निवडणूक लढवली होती. त्यामध्ये नाशिकची जागा शिवसेनेच्या वाट्याला आली होती. मात्र या जागेवर अपक्ष उमेदवाराने विजय मिळवल्याने हा निकाल शिवसेनेसाठी धक्कादायक मानला जात आहे.

मतमोजणीच्या पहिल्या फेरीत गोकुळ गीते यांना ३५७ मते मिळाली, तर नरेंद्र दराडे यांच्या पारड्यात २४८ मते पडली. एकूण १३ मते अवैध ठरल्यामुळे विजयासाठी ३०३ मतांचा कोटा निश्चित करण्यात आला होता. गोकुळ गीते यांनी पहिल्याच फेरीत हा टप्पा पार केल्याने पुढील पसंतीक्रमाच्या मतांची मोजणी करण्याची आवश्यकता भासली नाही, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली.

या निकालानंतर राज्यातील राजकीय समीकरणांवर नव्याने चर्चा सुरू झाली असून महायुतीतील अंतर्गत घडामोडींवरही याचे परिणाम दिसून येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---