घटस्फोटाला नकार दिला म्हणून पत्नीची नाक-तोंड दाबून हत्या; हार्ट अटॅकचा बनाव पोस्टमॉर्टममुळे उघड, पती आणि सासूला अटक…!

---Advertisement---

 

बदलापूरमधील एरंजाड गावात पत्नीने घटस्फोटास नकार दिल्याच्या रागातून पतीने तिची नाक-तोंड दाबून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मृत्यू हार्ट अटॅकने झाल्याचा बनाव करण्यात आला होता. मात्र, पोस्टमॉर्टम अहवालातून हा खून असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी पती आणि सासूला अटक केली आहे.

मृत महिला प्राजक्ता मेहेर यांचा २०१० मध्ये योगेश मेहेर याच्यासोबत विवाह झाला होता. त्यांना दोन मुले आहेत. दरम्यान, योगेशचे गावातीलच पूजा मेहेर या महिलेशी प्रेमसंबंध जुळल्यानंतर त्याने पत्नीवर घटस्फोटासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली होती. १४ मार्च २०२६ रोजी प्राजक्ताच्या माहेरच्या मंडळींना बोलावून “हवे तेवढे पैसे घ्या आणि मुलीला घेऊन जा,” अशी ऑफर दिल्याचा आरोप प्राजक्ताच्या वडिलांनी केला आहे.

८ एप्रिल रोजी पती-पत्नीमध्ये पुन्हा वाद झाला. त्यानंतर ९ एप्रिल रोजी योगेशने प्राजक्ताचा हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याची माहिती तिच्या नातेवाईकांना दिली. सुरुवातीला पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती.

मात्र, प्राजक्ताच्या कुटुंबीयांनी संशय व्यक्त केल्याने तिचे मुंबईतील जे. जे. रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. २३ जून रोजी प्राप्त झालेल्या पोस्टमॉर्टम व व्हिसेरा अहवालात प्राजक्ताचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने नसून नाक-तोंड दाबून गुदमरवून हत्या करण्यात आल्याचे स्पष्ट झाले.

या अहवालानंतर बदलापूर पश्चिम पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करत पती योगेश मेहेर आणि सासू अरुणा मेहेर यांना अटक केली आहे. तसेच योगेशची कथित प्रेयसी पूजा मेहेर आणि नणंद हर्षदा कोंडीलकर व कुसुम बोराडे यांनाही या गुन्ह्यात आरोपी करण्याची मागणी प्राजक्ताच्या कुटुंबीयांनी केली असून, पोलिसांकडून त्यादृष्टीने पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---