जळगाव : जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावर अपघातांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यात २०२४ या वर्षांत ५६१ अपघातात ४४१ जणांना अपघातात आपले प्राण गमवावे लागले आहेत. या अपघातांमध्ये दुचाकी वाहन चालकांना हेल्मेट परिधान करणे अनिवार्य असतांना बहुतांशी दुचाकीस्वारांनी हेल्मेट घातले नसल्याचे समोर आले आहे. अशा गंभीर समस्येवर मात करण्यासाठी पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी अतिशय महत्त्वपूर्ण आदेश पारित केला आहे. यानुसार १ जानेवारी २०२५ पासून राष्ट्रीय महामार्गावर मोटरसायकल धारकांना हेल्मेट घालणे सक्तीचे करण्यात येणार आहे.
काय सांगतो कायदा
दुचाकीस्वार तसेच मागे बसणाऱ्यांसाठी मोटार वाहन कायद्यानुसार, १९८८ च्या कलम १२९ नुसार हेल्मेट घालणे सक्तीचे आहे. हेल्मेट परिधान केल्यास अपघात झाल्यास जीव वाचण्याची शक्यता ८० % पर्यंत वाढते. त्यामुळे सर्व नागरिकांना हेल्मेट घालणे आवश्यक असून, या नियमांचे उल्लंघन केल्यास दंडास पात्र ठरवले जाईल.
जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी स्पष्ट केले आहे की, हेल्मेट घालण्याचा आदेश फक्त राष्ट्रीय महामार्गावर लागू असेल. १ जानेवारी २०२५ पासून हे नियम कडकपणे लागू करण्यात येणार आहेत.