---Advertisement---

Jalgaon News: शहरात 100 कोटींच्या निधीतील रस्त्यांची कामे दोन महिन्यांत पूर्ण करा- आ.सुरेश भोळे यांच्या अधिकाऱ्यांना कानपिचक्या

by team
---Advertisement---

जळगाव, 10 फेब्रुवारी: शहरातील 100 कोटी रुपयांच्या निधीतून सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांची पूर्तता दोन महिन्यांत करा, सार्वजनिक शौचालये रात्री 12 पर्यंत सुरू ठेवा, तसेच गोलाणी व्यापारी संकुलातील जीर्ण ड्रेनेज पाइप तातडीने बदला, अशा सूचना आमदार सुरेश भोळे यांनी महापालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

महापालिका आयुक्तांच्या दालनात सोमवारी (10 फेब्रुवारी) आमदार भोळे यांच्या अध्यक्षतेखाली विकासकामांचा आढावा बैठक पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, महापालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता नवनाथ सोनवणे, महावितरण व महापालिकेचे विविध अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत आमदार भोळे यांनी शहरातील विकासकामांबाबत अधिकाऱ्यांना चांगलेच खडसावत मक्तेदारांनाही तंबी दिली. हुडको घरकुलधारकांकडील थकबाकी वसूल करण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही त्यांनी सांगितले.

प्रमुख सूचना आणि निर्देश

रस्ते विकास: अजिंठा चौफुली ते विमानतळापर्यंत नवीन वीजखांब उभारावेत. अयोध्यानगरमधील अपूर्ण रस्ते दोन महिन्यांत पूर्ण करावेत. गणेश कॉलनी रस्त्याचे काम दोन दिवसांत सुरू करावे. वॉर्ड क्र. 17 मधील अपूर्ण रस्त्यांची त्वरित पूर्तता करावी.

सार्वजनिक सुविधा: शहरातील सार्वजनिक शौचालये रात्री 12 पर्यंत सुरू ठेवावीत. मेहरुण परिसरातील शौचालयासाठी जागा निश्चित करावी. पिंप्राळा उपनगर आणि शिवाजीनगर उड्डाणपुलाखाली शौचालय उभारावीत.

स्वच्छता आणि ड्रेनेज: गोलाणी व्यापारी संकुलातील जीर्ण ड्रेनेज पाइप तातडीने बदलावेत. पानटपऱ्या व हॉटेलमध्ये कचरा पेट्या ठेवण्यास बंधनकारक करावे आणि पालन न करणाऱ्यांवर दंड आकारावा. घनकचरा प्रकल्पस्थळी नियमित पाण्याचा फवारा मारावा.

वाहतूक आणि अतिक्रमण: कालिंका माता मंदिराजवळ वाहतूक नियंत्रक दिवे बसवावेत. अजिंठा चौक परिसरातील टपऱ्यांचे अतिक्रमण त्वरित हटवावे. फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करावी आणि अतिक्रमणधारकांची यादी तयार करावी.

शासकीय मालमत्ता कर वसुली: शासकीय कार्यालयांकडून थकीत मालमत्ता कर वसूल करण्यासाठी प्रयत्न करावेत.

स्मशानभूमी व्यवस्थापन: नेरी नाका स्मशानभूमीत पाण्याची साठवणुकीची व्यवस्था करावी.

नवीन घरे: झोपडपट्टी भागात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरे बांधावीत.

शहरातील अनेक समस्या मार्गी लावण्यासाठी अधिकाऱ्यांनी तत्काळ पावले उचलावीत, अन्यथा कारवाईस सामोरे जावे लागेल, असा इशारा देत, विकासकामे गतीने पूर्ण करण्याचे निर्देश आमदार भोळे यांनी अधिकाऱ्यांना दिले.

 

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment