Leopard attack : गेल्या महिन्यात यावल तालुक्यातील पाडळसा शेतशिवारात त्याचप्रमाणे डोंगर कठोरा भागातील मोहाडी शेतशिवारात बिबट्याची मादी तिच्या बछड्यांसह आढळून आली आहे. शिवाय तेथून जवळच असलेल्या दहिगाव शिवारात पुन्हा बिबट्याचे दर्शन झाले असून एका मेंढपाळांची शेळी व कुत्र्यावर बिबट्याने झडप घालून फडश्या पाडला व पसार झाल्याची घटना घडली. यामुळे परिसरात पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या परिसरात बिबट्यांची नेमकी संख्या किती? असा प्रश्न उपस्थित होत आहे. दहिगावकरांमध्ये पुन्हा बिबट्याबाबत भीती निर्माण झाली आहे.
शनिवारी (३ मे) पहाटेच्या सुमारास जनार्दन तुकाराम महाजन यांचे दहिगाव शिवारातील शेत गट नंबर ११२, दहिगाव शिवारामध्ये मेंढपाळाचे यादव कुटुंब त्यांचा फड घेऊन मुक्कामी आहे. या मेंढपाळ कुटुंबीयांनी बिबट्या झाडावरून उतरताना बघितला. दरम्यान, बिबट्याने मेंढपाळाच्या वस्तीवरील कुत्र्यावर हल्ला करून ओढत नेले. तर काही वेळातच काही अंतरावरील बाळू रमेश माळी यांचे शेतातही मेंढपाळाचा फड आहे. यातून बिबट्याने एका बकरीवर हल्ला करीत बकरीचा फडशा पाडल्याचे बाळू माळी व मेंढपाळांनी बघितले. या घटनेची माहिती तत्काळ वनविभागाला देण्यात आली.
यानंतर वनविभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. या मेंढपाळांच्या वस्तीवर घटनास्थळी बिबट्याच्या पावलांचे ठसेसुद्धा उमटलेले आहेत. मात्र ते ठसे तडसाचे असल्याचा दावा वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी केला. तर तडस हा वन्यप्राणी झाडावर चढू शकत नाही, असे प्रत्यक्षदर्शी शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. या परिसरात वावरणारा वन्यप्राणी बिबट्याच असून आम्ही बिबट्याला प्रत्यक्ष पाहिले असल्याचे शेतमालक बाळू माळी व जनार्दन महाजन यांनी म्हटले आहे. यामुळे दहिगाव परिसरातील शेतकरी सर्वसामान्य नागरिकांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली आहे. उन्हाळ्याच्या दिवसात शेतीकामासाठी शेतकऱ्यांना मजूर मि ळणे कठीण झाले आहे. बिबट्याच्या संचारामुळे वनविभागावर प्रश्न उपस्थित होत आहे. बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी सर्व स्तरातून मागणी केली जात आहे.
प्रत्यक्षदर्शी म्हणतात, ‘तो बिबट्याच’
बिबट्या दिसल्याबाबत वनविभागाला सूचना दिल्यानंतर तत्काळ त्यांनी घटनास्थळी भेट दिली. बिबट्याचे ठसेसुद्धा उमटलेले आहेत, मात्र ते तसे तळसाचे आहेत, असे वनविभागाचे म्हणणे आहे. झाडावर चढत नाही, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. तो बिबट्याच आहे. आम्ही प्रत्यक्षदर्शीनी बघितले आहे. असेही शेतमालक बाळू माळी व जनार्दन महाजन यांनी म्हटले आहे.