जंगलातील रात्रीची गूढ शांतता, अधूनमधून दृष्टिक्षेपास पडणारे वन्यप्राणी, त्यांच्या हालचाली, पाणवठ्यांवरील वातावरण अनुभण्यासाठी जळगाव वनविभागातर्फे बुद्ध पौर्णिमेला ‘निसर्गानुभव’ उपक्रम राबविण्यात आला. जिल्ह्याच्या १२ तालुक्यांतीत ८ वनपरिक्षेत्रात वन्यप्राण्यांसाठी नैसर्गिक, १३० कृत्रिम पाणवठ्यांच्या ठिकाणी ४५ निरीक्षण मनोऱ्यांवरून वन्यप्राणी गणना करण्यात आली. या वेळी नीलगाय, बिबट, चितळ, कोल्हे विशेषतः पांढऱ्या बगळ्यांसोबत काळ्या बगळ्यांसह सुमारे दोन हजार १६३ विविध वन्यजीवांचा अधिवास आढळून आला आहे. जळगाव वनविभागांतर्गत ८ वनपरिक्षेत्रात दरवर्षी बुद्ध पौणिमेस स्वच्छ चंद्रप्रकाशात वनविभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांसह ४५ निरीक्षण मनोऱ्यांवर ४५ पथके नियुक्त होती. त्यात जळगावमधील नागरिकांसह महाविद्यालयीन विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था आणि वन्यजीव अभ्यासक, पर्यावरणप्रेमींनी वन्यप्राणी गणनेत सहभाग नोंदवला.
वनपरिक्षेत्रात २,१५३ वन्यजीवांचा अधिवास
वन्यप्राणी गणनेअंतर्गत मुक्ताईनगर १८०, पाचोरा १८०, पारोळा १५३. जामनेर ३८३, जळगाव ११०, वढोदा ५५५, चाळीसगाव २३४ आणि एरंडोल ४०२ अशा ८ वनपरिक्षेत्रात २ हजार १५३ वन्यजीव आढळून आले आहेत. यात पाणबदक ६, पांढरा बगळा २५, काळा बगळा १०, मुंगुस १. मोर १३९, माकड ८०, रानमांजर ९. रानडुक्कर ५१३, रानकुत्रा ६. घुबड ६. लांडगा ११, चिंकारा १०, चितळ १०४, नीलगाय ६३६, बिबट ३. हरीण २४५, टिटवी १३, अस्वल १२, भेकर ११, ससा ८९, सायाळ १०, साळींदर ५. खोकड १७, कोल्हा ३२. काळवीट १३९, तडस २१ असे एकूण २ हजार १५३ वन्यजीवांचा संचार जळगाव जिल्ह्यातील ८ वन परिक्षेत्रात असल्याचे दिसून आले आहे.
वनसंपदा असेल तर सृष्टी टिकेल
जळगाव जिल्ह्याचे एकूण राखीव वनक्षेत्र ८०१.५८ चौरस मैल असून ७६४.०५ चौरस मैल वनविभागाकडे आणि ३७.५३ चौरस मैल महसूल विभागाकडे आहे. वनविभागांतर्गत विविध तालुका वनपरिक्षेत्रात वेळोवेळी वृक्षलागवड आणि वनसंवर्धन योजनांची अंमलबजावणी केली जात असल्याने वनसंपदा विपुल प्रमाणात आहे. वन्यजीव भक्ष्य आणि पाण्याच्या शोधार्थ मानवी वसाहतींकडे येऊ नयेत यासाठी १३० कृत्रिम पाणवठे तयार करण्यात आले असून वन असेल तर सृष्टी आहे. यानुसार वनसंपदा आणि वन्यजीव संरक्षण हे आमचे ध्येय आहे.
प्रवीण ए., उपवनसंरक्षक, जळगाव.