---Advertisement---

Jalgaon News : रस्त्यांसह विकासकामे न करणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाका, आमदार सुरेश भोळेंच्या महापालिका प्रशासनाला सूचना

---Advertisement---

Jalgaon News : शहरातील रस्त्यांच्या कामांसंदर्भात काही ठेकेदार जनतेला वेठीस धरण्याचा प्रयत्न करीत आहेत. निधी मिळत नाही, अशी बोंब ठोकून उगाच शासनाला बदनाम करण्याचा प्रयत्न काही ठेकेदार करीत आहेत. अशा काम न करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाका, अशा सूचना भाजपचे आमदार सुरेश भोळे यांनी महापालिका प्रशासनाला दिल्या आहेत.

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आमदार सुरेश भोळे यांनी सोमवारी (१९ मे) महापालिकेत सर्व विभागप्रमुखांसह वनविभाग, महावितरणच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. बैठकीनंतर आमदार भोळे यांनी सांगितले की, शहरात पावसाळ्यापूर्वी नालेसफाईची कामे पूर्ण करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. ज्या ठिकाणी संरक्षक भिंतींची गरज आहे. त्या ठिकाणी तातडीने ती कामे हाती घेऊन पूर्ण करण्यास सांगण्यात आले आहे.

३० मेपर्यंत शहरातील नालेसफाईची कामे पूर्ण होणे अपेक्षित आहे. तसेच वादळी वाऱ्यामुळे झाडांच्या फांद्या पडून वीजपुरवठा खंडित होतो. त्यासाठी महावितरण आणि महापालिका अधिकाऱ्यांनाही सूचित करण्यात आले आहे. पावसाळ्यात शहरात स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने ३० हजार झाडे लावण्याचा उपक्रम हाती घेतला जाणार असल्याचे आमदार भोळे यांनी सांगितले. शहरातील नागरिकांना समस्या खूप आहेत. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी जबाबदारी ओळखून काम करणे गरजेचे असत्याचे आमदार भोळे यांनी सांगितले.

नागरिकांना वेठीस धरू नका

ठेकेदार काम करीत नाहीत, याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असत्याचा आरोप आमदार भोळे यांनी केला. निविदा भरताना ठेकेदाराची बीड कॅपॅसिटी बघितली जाते. ती असल्यानंतरच त्याला ठेका दिला जातो. जोपर्यंत काम पूर्ण होणार नाही, तोपर्यंत बिले कशी अदा होतील, असा सवालही त्यांनी उपस्थित करून ठेकेदार विनाकारण शासनाला बदनाम करीत असल्याचे त्यांनी सांगितले. जे ठेकेदार काम करीत नाहीत, अशांच्या तक्रारी यापूर्वीच करण्यात आल्या असून, त्यांना काळ्या यादीत टाकण्याच्या सूचना महापालिका प्रशासनाला करण्यात आल्या आहेत.

महापालिकेसाठी महायुतीचा प्रयत्न

महापालिका निवडणुकीसाठी आमचा प्रयत्न महायुतीचाच राहणार आहे: परंतु पक्षश्रेष्ठी काय आदेश देतात, त्यानुसार निर्णय होईल. भाजप नेते जलसंपदामंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील हे याबाबत चर्चा करतीलच. भाजप हा कायम निवडणुकीच्या तयारीत असतोच. त्यामुळे महापालिका निवडणुकीसाठी जसे आदेश येतील, तसे पालन होईल, असेही आमदार सुरेश भोळे यांनी सांगितले.

डांबरी रस्ते १ जूनपूर्वी पूर्ण होणार

शहरातील काही भागांमध्ये डांबरी रस्त्यांची कामे सुरू आहेत. पावसाळ्यापूर्वी ही कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. काही डांबरी रस्त्यांना सिलकोट करणे बाकी आहे. आठवडाभरात ते पूर्ण होईल. जवळपास ११ रस्त्यांचे डांबरीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. १ जूनपूर्वी ही कामे पूर्ण होतील, असा दावाही आमदार भोळे यांनी केला.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment