जळगाव : जिल्ह्यात उन्हाचा तडाखा कमी असला तरी आर्द्रतायुक्त आणि ढगाळ वातावरणामुळे उन्हाची दाहकता जास्तच जाणवून येत आहे. तर दुसरीकडे जिल्ह्यात तुरळक पावसाच्या सरीच्या वर्षावामुळे बऱ्याच ठिकाणी शेतमशागतीच्या कामांना वेग आला असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, गुरुवारी (१२ जून) रोजी नंतर मान्सून काही प्रमाणात सक्रिय होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
गेल्या २४ तासात जिल्ह्यात तुरळक स्वरूपात पाऊस झाला असून सरासरी १.४ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तसेच आगामी दोन ते तीन दिवसात ढगाळ तसेच आभ्राच्छादित वातावरणासह तुरळक ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मात्र गुरुवार, १२ जूननंतर मान्सून काही प्रमाणात सक्रिय होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
शुक्रवारी (६ जून) ३९ अंश कमाल तापमान असले तरी हवेतील ३६ टक्के आर्द्रतेनुसार प्रत्यक्षात ४२ अंश तापमान असत्याचे जाणवून येत आहे. दुपारनंतर ढगाळ वातावरण दिसून आले.
शनिवार ते सोमवार दरम्यान हवामान ढगाळ तसेच तापमान ३९ ते २९ अंशा दरम्यान राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून सप्ताहाच्या पूर्वार्धात तुरळक ते मध्यम पावसाच्या सरीचा अंदाज आहे. गुरुवार, १२ जूननंतर जिल्ह्यात मेघगर्जनेसह जोरदार ते मध्यम पावसासह मान्सून जोरदार सक्रिय होणार असल्याचे संकेत हवामान विभागाने वर्तविले आहेत.