---Advertisement---
रावेर तालुक्यातील सावदा शहरामध्ये नगरपालिकेच्या भोंगळ कारभारामुळे नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याची भीषण परिस्थिती समोर आली आहे. सावदा शहरातील जगमाता परिसरासह अनेक भागांमध्ये मागील दोन ते तीन महिन्यांपासून पाणीपुरवठ्याचा फज्जा उडाला असून नागरिक अक्षरशः पाण्यासाठी भटकंती करत आहेत.
जगमाता परिसरातील महिलांना घरगुती वापरासाठी पाणी मिळवताना मोठी कसरत करावी लागत आहे. कडक उन्हाळ्यात पाण्याचा प्रश्न अधिक गंभीर बनला असून नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक वेळा नगरपालिका प्रशासनाकडे तक्रारी करूनही केवळ आश्वासन दिले जात असल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे.
सावदा शहरातील नागरिकांच्या म्हणण्यानुसार, नगरपालिका कर्मचारी परिसरात पाहणीसाठी येतात, परिस्थितीची माहिती घेतात; मात्र प्रत्यक्षात कोणतीही ठोस उपाययोजना केली जात नाही. त्यामुळे पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस अधिकच गंभीर होत चालला आहे. “कर वसुलीत पुढे असलेली नगरपालिका नागरिकांना पिण्याचे पाणी देण्यात मात्र पूर्णपणे अपयशी ठरत आहे,” असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.
एका बाजूला वाढते तापमान आणि दुसऱ्या बाजूला विस्कळीत पाणीपुरवठा यामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. महिलांना लांब अंतरावरून पाणी आणावे लागत असून ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांनाही या समस्येचा मोठा फटका बसत आहे.
संबंधित अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी तातडीने लक्ष घालून कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. अन्यथा येत्या काही दिवसांत महिला आणि नागरिक मोठ्या संख्येने सावदा नगरपालिकेवर मोर्चा काढतील, असा इशाराही देण्यात आला आहे.









