जळगाव : शहरात गुरुवार, १६ रोजी एकीकडे शिवकॉलनी पुलावरुन अज्ञात वाहनाने धडक देऊन झालेल्या अपघातात एक जेष्ठ नागरिक ठार झाले. तर दुसरीकडे ममुराबाद रस्त्यावर ट्रॅक्टरने दुचाकीस्वाराला धडक दिल्याने अपघात होऊन दुचाकीस्वार तरुण जागीच ठार झाला आहे. जळगाव शहरात एकाच दिवशी एकापाठोपाठ दुसरी अपघाताच्या घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.
विलास रामसिंग भिल (वय ४० रा. ममुराबाद ता.जि.जळगाव) असे मयत तरूणाचे नाव आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे.
जळगाव तालुक्यातील ममुराबाद गावात विलास भील हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला होता. तो ऊस तोडण्याचे काम करून आपला उदरनिर्वाह करत होता. गुरूवार, १६ जानेवारी रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास विलास हा दुचाकी (एमएच १० एआय ०३८१) ने जळगाव शहरातून ममुराबाद येथे घरी येत होता. त्याचे वेळी ममुराबाद रस्त्यावरील हॉटेल मितवा जवळून जात असतांना रस्त्यावरुन समोरून सिमेंटने भरलेले ट्रॅक्टर क्रमांक (एमएच १९ पीआय ३३७५) ने जोरदार धडक दिली.
या धडकेत दुचाकीस्वार विलास भिल हा जागीच ठार झाला. ही घटना घडल्यानंतर जळगाव तालुका पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. मृतदेहाचा पंचानामा करून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना करण्यात आला. याबाबत ट्रॅक्टरवरील अज्ञात चालकावर जळगाव तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.