---Advertisement---
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेतृत्वाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापले आहे. सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाबाबत ‘विचार केला जाईल’ असे वक्तव्य झाल्यानंतर आमदार अमोल मिटकरी यांनी तीव्र आणि थेट प्रतिक्रिया दिली आहे. “विचार करू हा शब्दच येता कामा नये,” अशा शब्दांत त्यांनी पक्षातील नेत्या रुपाली चाकणकर यांना स्पष्ट भूमिका मांडण्याचा इशारा दिला आहे.
अमोल मिटकरी म्हणाले की, सुनेत्रा पवार ह्याच अजित पवार यांच्या खऱ्या राजकीय उत्तराधिकारी आहेत आणि त्या जागी दुसरा कोणताही पर्याय असू शकत नाही. “सुनेत्रा वहिनीच त्या जागेवर बसू शकतात. त्यांच्याच नेतृत्वात आम्ही काम करू,” असे ठाम मत त्यांनी व्यक्त केले.
नेतृत्वाबाबत संभ्रम निर्माण करणारी भाषा पक्षाच्या भावना दुखावणारी असल्याचे सांगत, प्रस्ताव आला तर विचार करू अशा शब्दांचा वापर टाळावा, असेही त्यांनी स्पष्ट केले. आज पक्षातील केवळ नेतेच नव्हे, तर तळागाळातील कार्यकर्त्यांचीही सुनेत्रा पवार यांच्याबाबत एकमुखी भावना असल्याचा दावा त्यांनी केला.
यावेळी मिटकरी यांनी निर्णय प्रक्रियेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “पक्ष हा फक्त वरिष्ठ नेत्यांचा नसून कार्यकर्त्यांचा आहे. निर्णय घेताना कार्यकर्त्यांना विचारात घेतले जाणार का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
अजित पवार यांच्याशी भावनिक नातं असलेल्या कार्यकर्त्यांचा उल्लेख करताना मिटकरी म्हणाले, “अजित दादांसाठी रडलेला, जीवापाड प्रेम करणारा कार्यकर्ता आजही त्यांना विसरलेला नाही. असे कार्यकर्तेच पक्षाचा खरा कणा आहेत,” असे भावनिक वक्तव्य त्यांनी केले.
या वक्तव्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेतृत्वावरून नवा राजकीय वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.









