---Advertisement---
जळगाव : शहरात पोलीस दलाच्या प्रतिमेला धक्का देणारी गंभीर घटना समोर आली आहे. अवैध वाळू तस्करी प्रकरणात संगनमत केल्याचा आरोप एका हेड कॉन्स्टेबलवर सिद्ध झाल्यानंतर त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. रामकृष्ण इंगळे असे संबंधित कर्मचाऱ्याचे नाव असून या घटनेमुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमुळे हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. या व्हिडिओमध्ये वाळू उपसा करण्यासाठी दरमहा ठराविक रक्कम देण्याबाबत चर्चा होत असल्याचे स्पष्टपणे दिसते. सुरुवातीला ५,००० रुपये दिल्याचे सांगण्यात येत असताना, पुढे ४,००० रुपये देण्याचे सुचवले जात असल्याचे संभाषणात ऐकू येते. याशिवाय कोणतीही भीती न बाळगता अवैध काम सुरू ठेवण्याचे संकेतही दिल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी तात्काळ चौकशीचे आदेश दिले. प्राथमिक तपासानंतर संबंधित हेड कॉन्स्टेबलला निलंबित करण्यात आले आहे. गिरणा नदी परिसरातील अवैध वाळू तस्करीशी संबंधित साखळी पुन्हा चर्चेत आली असून, या प्रकरणात आणखी काही धागेदोरे समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, या घटनेमुळे जळगाव पोलीस दलाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, पुढील तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.








