---Advertisement---
नवी दिल्ली : देशाचा ७७ वा प्रजासत्ताक दिन राजधानी दिल्लीतील कर्तव्यपथावर अत्यंत उत्साहात आणि दिमाखात साजरा करण्यात आला. भारतीय लष्करी सामर्थ्य, विविधतेतून एकता दर्शवणारे चित्ररथ आणि अंतराळ क्षेत्रातील भारताची ऐतिहासिक भरारी हे यंदाच्या सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरले. या सोहळ्यात महाराष्ट्राच्या ‘गणेशोत्सव: आत्मनिर्भरतेचे प्रतीक’ या विषयावरील चित्ररथाने लक्ष वेधून घेतले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांना अशोक चक्रा’ने सन्मानित करण्यात आले.
प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य सोहळ्याला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी.पी राधाकृष्णन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, विशेष निमंत्रित प्रमुख पाहुणे म्हणून युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष अँटोनियो कोस्टा व युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयन , केंद्रीय मंत्री अमित शहा, राजनाथ सिंग , नितीन गडकरी त्यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री व विशेष निमंत्रित उपस्थित होते. सोहळ्याच्या सुरुवातीला प्रधानमंत्री मोदी यांनी ‘नॅशनल वॉर मेमोरियल’ येथे शहीद जवानांना आदरांजली वाहिली. त्यानंतर मुख्य संचलनाला सुरुवात होण्यापूर्वी राष्ट्रपतींच्या हस्ते ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांना ‘अशोक चक्र’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले. मूळचे फायटर पायलट असलेले शुक्ला २०२० पासून इस्रोमध्ये (ISRO) प्रतिनियुक्तीवर असून, त्यांनी नुकतीच आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) २० दिवसांची ऐतिहासिक मोहीम यशस्वीपणे पूर्ण केली आहे. चार दशकांनंतर अंतराळात जाणारे दुसरे भारतीय आणि ISS वर जाणारे पहिले भारतीय ठरल्याबद्दल, तसेच त्यांच्या अदम्य धैर्यासाठी त्यांना या ‘अशोक चक्र’ शौर्य पदकाने गौरवण्यात आले.
यानंतर पार पडलेल्या पथसंचलनात महाराष्ट्राच्या चित्ररथाने महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे आणि आर्थिक सामर्थ्याचे शानदार दर्शन घडवले. लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवातून ज्या सामाजिक क्रांतीची मुहूर्तमेढ रोवली, तीच चळवळ आज आधुनिक भारताला कशी ‘आत्मनिर्भर’ बनवत आहे, याचे प्रभावी चित्रण या चित्ररथात करण्यात आले होते. ‘वंदे मातरम्’ या गीताला १५० वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, राज्याची प्रदीर्घ परंपरा या माध्यमातून जगासमोर मांडली गेली. या चित्ररथाच्या अग्रभागी महाराष्ट्राच्या ऊर्जेचे प्रतीक असलेला भव्य ढोल वाजवणारी महिला, मध्यभागात गणपतीची मूर्ती साकारणारा मूर्तिकार आणि शेवटच्या भागात अष्टविनायक मंदिराची प्रतिकृती अशा कलात्मक रचनेने सर्वांचे डोळ्यांचे पारणे फेडले. चित्ररथासोबत नऊवारी साडी परिधान केलेल्या महिलांच्या लेझीम पथकाने आणि ढोल-ताशांच्या गजराने कर्तव्यपथ दुमदुमून गेला होता.
गणेशोत्सवाच्या माध्यमातून मूर्तिकार आणि सजावट कलाकारांना मिळणारा शाश्वत रोजगार आणि त्यातून विणली गेलेली आर्थिक साखळी हे या सादरीकरणाच्या केंद्रस्थानी होते. महाराष्ट्र शासनाने २०२५ पासून हा उत्सव ‘राज्य महोत्सव’ म्हणून साजरा करण्यास सुरुवात केल्याने या चित्ररथाला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. भारतीय लष्कराचे अश्वदल, आधुनिक स्वदेशी क्षेपणास्त्र प्रणाली आणि विविध राज्यांच्या चित्ररथांच्या मांदियाळीत महाराष्ट्राच्या या सांस्कृतिक वारशाने आपली वेगळी ओळख निर्माण केली.









