जळगाव : नवीन घराच्या बांधकाम मजुरांना पाणी मिळावे याकरिता एक ५२ वर्षीय महिला ही पहाटे ३ वाजेच्या सुमारास आपल्या पतीच्या दुचाकीने जात होती. त्यांची दुचाकी अजिंठा चौकात आली असता एका अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू झाला तर महिलेच्या पतीला जबर दुखापत झाली आहे. याप्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरुध्द एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनिता सुनील राणे (वय ५२, रा.सतगुरुनगर, जळगाव) असे मयत महिलेचे नाव आहे. रिंगरोड परिसरात असलेल्या त्यांच्या घराचे बांधकाम सुरु आहे. या बांधकामावरील मजुरांना पाणी मिळावे यासाठी राणे दाम्पत्य पहाटेच रिगरोडकडे जात होते. परंतु, वाटेतच त्यांच्यावर काळाने घाला घातला. अनिता राणे यांच्या पश्चात पती, मुलगा तन्मय, मुलगी आदिती असा परिवार आहे.
अनिता राणे या बुधवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास पती सुनील बाबुराव राणे यांच्यासोबत सतगुरु नगरातून दुचाकीने रिंगरोड भागात बांधकाम सुरु असलेल्या त्यांच्या घराकडे पाणी भरायला जात होते. त्याचवेळी अजिंठा चौकात आले असताना समोरून आलेल्या एका अज्ञात वाहनाने राणे यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत राणे दांम्पत्य दुर फेकले केले. त्यात अनिता राणे यांचे डोकं थेट धडापासून वेगळे झाले. त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. तर पती सुनील राणे यांनाही मार लागला. पहाटेची वेळ असल्याने रस्त्यालगत कोणीही नव्हते.
त्यामुळे दांम्पत्याला उडविणाऱ्या वाहनचालकाने घटनास्थळाहून पळ काढला. एका रिक्षा चालकाला अपघात झाल्याचे कळल्यानंतर याबाबत त्याने एमआयडीसी पोलिसांना कळविले. या प्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरुध्द एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.