जळगाव : पाचोरा येथे महावितरणचे सहायक अभियंता मनोज जगन्नाथ मोरे (वय 38) यांना 29 हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव युनिटच्या पथकाने रंगेहात पकडले.
तक्रारदार (वय 32) यांचा सोलर फिटिंगचा व्यवसाय आहे. त्यांनी तीन प्रकरणांच्या रिलीज ऑर्डरसाठी प्रत्येकी 3 हजार प्रमाणे 9 हजार तसेच यापूर्वीच्या 28 प्रकरणांसाठी 70 हजार अशी एकूण 79 हजार रुपयांची लाचेची मागणी तक्रारदाराकडे केली होती. लाचलुचपत विभागाकडे या संदर्भातील तक्रार 11 ऑगस्ट रोजी दाखल झाली होती.
---Advertisement---
या तक्रारीच्या पडताळणीदरम्यान आरोपीने पहिल्या हप्त्यात 20 हजार आणि चालू प्रकरणांसाठी 9 हजार अशी 29 हजारांची रक्कम घेण्याबाबत तयारी दाखवली होती.
मंगळवारी (12 ऑगस्ट) रोजी लाचलुचपत विभागाच्या पथकाने आरोपीच्या म्हणजेच महावितरणच्या कार्यालयात सापळा लावून ही रक्कम स्वीकारताना त्याला ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
या कारवाईत सहभागी पर्यवेक्षण अधिकारी योगेश ठाकूर, सापळा व तपास अधिकारी पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.कॉ. राकेश दुसाने, अमोल सूर्यवंशी, प्रणेश ठाकूर व चालक सुरेश पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.