Accident News : कारमध्ये अवैधरित्या गॅस भरताना सिलेंडरचा स्फोट

जळगाव : व्यावसायिक सिलिंडरच्या किंमतीमध्ये भरमसाठ वाढ झाल्याने व्यावसायिक ठिकाणी घरगुती सिलिंडरचा अवैध वापर सर्रासपणे करण्यात येत आहे. याशिवाय गॅसवरील वाहनांमध्ये देखील घरगुती सिलिंडरमधून धोकादायक पद्धतीने गॅस भरण्याचा गंभीर प्रकार जळगाव शहरात काही ठिकाणी घडत असतात. अशाच प्रकारे कारमध्ये गॅस भरत असताना सिलेंडरचा भीषण स्फोट झाला. या घटनेत ४ जण गंभीरपणे जखमी झाल्याची घटना घडली आहे. 

जळगाव शहरातील काही भागात घरगुती गॅस सिलेंडरमधून गाड्यांमध्ये गॅस भरून दिला जात असतो. या मुख्यतः रिक्षांमध्ये गॅस भरण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे.
तसेच कारमध्ये देखील हा अवैधरित्या गॅस वापरला जात असतो. अशाच प्रकार जळगाव शहरातील इच्छा देवी चौकात घडला. जळगाव शहरातील इच्छादेवी चौकात चारचाकी वाहनामध्ये घरगुती गॅस भरत असताना अचानक गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने उभी असलेली चारचाकी वाहनासह एक दुचाकी जळून खाक झाली. ही घटना आज मंगळवारी सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान घडली.  इच्छादेवी पोलीस स्टेशनशेजारी अवैध पद्धतीने कारमध्ये गॅस भरला सिलेंडरचा स्फोट झाल्यानंतर ओमनी गाडीने पेट घेतला. यानंतर भीषण आग लागली. या अपघातात ४ जण गंभीर जखमी झाले आहेत. यात गॅस भरणारे तिघांसह गाडी मालकाचा समावेश आहे. या गंभीर जखमींना रुग्णालयात हलवण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत. 

ओमिनीमध्ये गॅस भरत असताना भडका उडून सिलेंडरचा अचानक स्फोट झाला. या स्फोटात ओमिनी गाडी पूर्णपणे जळून खाक झाल्याची घटना घडली आहे.  याशिवाय गॅस भरणाऱ्याचे दुकान व एक दुचाकी देखील पूर्णपणे जळून खाक झाले आहे. घटनेची माहिती मिळाल्यावर महापालिकेचा अग्निशमन बंबाने घटनास्थळ गाठून आग आटोक्यात आणली. मात्र, तोपर्यंत संपूर्ण कारसह दूचाकी तसेच दुकान पूर्णपणे जळून खाक झाले होते.