जळगाव : शहरातील शैक्षणिक संस्थांच्या १०० मीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या पान टपरी चालकांविरुद्ध कोटपा कायद्याअंतर्गत कारवाई सुरू करण्यात आली आहे. पोलिस अधिक्षक डॉ. माहेश्वर रेड्डी यांच्या सूचनेवरून आज ६ पान टपऱ्या जप्तीची कारवाई करण्यात आली आहे.
केंद्र सरकारने तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन टाळण्यासाठी अनेक उपाययोजना आणि धोरणे स्वीकारली आहेत. काही महत्त्वाच्या उपक्रम आणि नियमावली खालीलप्रमाणे आहेत:
या कायद्यांतर्गत तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या जाहिरातींवर बंदी, सार्वजनिक ठिकाणी तंबाखूचे सेवन करणाऱ्यांवर दंड, तंबाखू उत्पादक कंपन्यांना उत्पादनावर चेतावणीची सूचना असलेले पॅकेट्स लावण्याची आवश्यकता यावर जोर देण्यात आला आहे.
कोटपा कायद्यानुसार मंगळवार, १७ डिसेंबर रोजी शनिपेठ पोलीस स्टेशन हद्दीतील चौबे शाळा आणि मनपा शाळा क्रमांक १७ यांच्या १०० मीटर परिसरातील पान टपरी चालकांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली होती. तथापि, त्यानंतर देखील टपरी चालकांनी तंबाखूजन्य पदार्थांची विक्री सुरू ठेवली. यावर कारवाई म्हणून गुरूवार, १९ डिसेंबर रोजी पोलिस व महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने संयुक्तपणे कारवाई केली आणि संबंधित ६ पान टपऱ्या कायमस्वरूपी हटवून महापालिकेने ताब्यात घेतल्या.
यावेळी शहरातील विविध भागातील टपरी चालकांवर कारवाई करण्यात आली. यात इकबाल शेख उस्मान शेख (इस्लामपुरा),शंकर लिंगा गवळी (गवळीवाडा),भिका लिंगा गवळी (गवळीवाडा),गणी मोहमद डिगी (भिलपुरा),,प्रकाश नामदेव पाटील (बळीराम पेठ),अब्दुल करीम शेख इसा (काट्या फाईल) यांचा समावेश आहे.
याव्यतिरिक्त, पुढील दोन दिवसात शहरातील इतर पोलीस स्टेशन हद्दीतील शाळांच्या परिसरात असलेल्या पान टपरी चालकांविरुद्ध देखील कारवाई करण्यात येणार आहे.
या कारवाईत पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक साजिद मंसूरी, पोलीस उपनिरीक्षक योगेश ढिकले, युवराज कोळी, विजय खैरे, गिरीश पाटील, भागवत शिंदे, विकी इंगळे, अनिल कांबळे यांचे तसेच महानगरपालिकेचे अतिक्रमण विभागाचे अधिकारी संजय ठाकूर यांचे सहकार्य होते.