---Advertisement---
जळगाव : ‘संगीतात जशी घराणी असतात, तशीच जळगावला वकील क्षेत्रात घराणी आहेत. अत्रे, चित्रे, परांजपे अशी काही नावं आहेत. यातील स्व. अॅड. अच्युतराव म्हणजेच बाबासाहेब अत्रे यांच्या नावाने मिळालेला ‘अग्रणी’ पुरस्कार हे माझे भाग्यच. कारण बाबासाहेब अत्रे यांचे कार्य महान असून नवोदितांसाठी ते नेहमीच रोल मॉडेल ठरतील,’ असे प्रतिपादन ठाणे येथील नामवंत अॅड. व्ही.एन. आगाशे यांनी रविवारी केले.
कै. अॅड. अच्युतराव अत्रे यांच्या दहाव्या जयंतीनिमित्त शिक्षण प्रसारक मंडळ आणि गुरूवर्य अॅड. अ. वा. अत्रे प्रतिष्ठानतर्फे आयोजित कै. अॅड. अ.वा. अत्रे स्मृती ‘अग्रणी’ पुरस्कार सोहळ्याचे भैय्यासाहेब गंधे सभागृहात रविवारी आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी सत्काराला उत्तर देतांना ते बोलत होते.
---Advertisement---
याप्रसंगी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून मद्रास उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश संजय गंगापूरवाला, न्या. किशोर संत, नांदेड विद्यापीठाचे माजी कुलगुरू पंडीत विद्यासागर, निवड समितीचे अध्यक्ष अॅड. उज्ज्वल निकम, जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन, शिक्षणतज्ज्ञ अनिल राव, डॉ. प्रदीप जोशी, अॅड. सुशील अत्रे आदी उपस्थित होते.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते स्व. अॅड. अ.वा. अत्रे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. माजी मुख्य न्यायाधीश संजय गंगापूरवाला व मान्यवरांच्या हस्ते अॅड. व्ही.एन. आगाशे यांचा ‘अग्रणी’ पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. मानपत्र, रोख रक्कम, पुणेरी पगडी आणि स्मृतीचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते.
सत्काराला उत्तर देताना अॅड. आगाशे पुढे म्हणाले की, ‘हा पुरस्कार स्वीकारताना मी कृतकृत्य झालो असलो तरी एक जबाबदारीची भावनाही निर्माण झाली आहे. सचोटी, वक्तशीरपणा, शिस्त हे गुण वकीलाच्या अंगी असावे हे बाबासाहेबांच्या रूपातून आपण बघितले आहे. स्व. बाबासाहेब यांच्या कार्याचा एक अंश होण्याचा प्रयत्न नक्की केला जाईल,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तसेच हा हा पुरस्कार गुरू, आई-वडील, मित्र आणि कायदे क्षेत्रातील सहकाऱ्यांना समर्पित करीत असल्याचे अॅड. आगाशे यांनी सांगितले. यावेळी न्या. किशोर संत आणि निवड समितीचे अध्यक्ष अॅड. उज्वल निकम यांनीही मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अॅड. आनंद मुजुमदार यांनी तर आभार अॅड. तपन संत यांनी मानले.
मानपत्राचे वाचन पद्मनाभ देशपांडे यांनी केले. वकीलांनी पहिले दहा वर्ष केवळ काम करावे – संजय गंगापूरवाला प्रमुख पाहुणे मद्रास उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश संजय गंगापूरवाला यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले की, ज्यांच्या नावाने अग्रणी पुरस्कार दिला जातोय ते आणि ज्यांना पुरस्कार दिला जात आहे ते अशा दोन्ही व्यक्ती कायदे क्षेत्रात महनीय आहेत. अॅड. आगाशे हे अष्टपैलू व्यक्तिमत्व आहेत. केवळ कायदे क्षेत्रापुरता त्यांचे व्यक्तिमत्व मर्यादित राहिलेले नाही. क्रीडा, मनोरंजन, संगीत या क्षेत्राचीही त्यांना आवड असल्याचे परिचयातून स्पष्ट होते. नवोदित वकीलांनी कायदेक्षेत्रात येतांना सुरूवातीचे दहा वर्ष पैशांपेक्षा काम अधिक करावे, त्यानंतरची दहा वर्षे पैसा आणि काम करावे, असा सल्लाही संजय गंगापूरवाला यांनी दिला. स्व. अॅड. बाबासाहेब यांचे कायदेक्षेत्रात मोलाचे कार्य असल्याचेही ते म्हणाले.
पुरस्कार दरवर्षी प्रदान होणार – अॅड. सुशील अत्रे
कै. अॅड. अ.वा. अत्रे तथा बाबा यांच्या नावाने सुरू झालेल्या ‘अग्रणी’ या पुरस्काराचे हे प्रथम वर्ष आहे. दरवर्षी प्रतिष्ठानच्यावतीने हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. एक वर्षी कायदे क्षेत्रातील आणि दुसऱ्या वर्षी शिक्षण क्षेत्रातील नामवंतांना हा पुरस्कार देण्याचे नियोजन असल्याचे अत्रे प्रतिष्ठानचे अॅड. सुशील अत्रे यांनी प्रास्ताविकाच्या माध्यमातून जाहीर केले