आत्ता जळगावची केळी ‘एआय’च्या बळावर घेणार ग्लोबल भरारी….

---Advertisement---

 

Jalgaon : देशात सर्वाधिक केळी लागवड करणारा जिल्हा म्हणून ओळख असलेला जळगाव आता तांत्रिक क्रांतीकडे वाटचाल करत आहे. केळी उत्पादनात अव्वल असलेला जिल्हा निर्यात स्पर्धेतही मागे राहू नये, यासाठी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने ‘एआय’ आधारित निर्यातक्षम केळी उत्पादन प्रात्यक्षिके ही महत्त्वाकांक्षी योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. सेस निधीतून साकार होणाऱ्या या योजनेमुळे जळगावच्या केळीला जागतिक बाजारपेठेत नवे दार खुले होणार आहे.
जिल्ह्यात दरवर्षी ५० हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर केळीची लागवड होते. स्थानिक अर्थव्यवस्थेत या पिकाचा मोठा वाटा आहे. मात्र, निर्यातक्षम दर्जा, ग्रेडिंग, पॅकिंग आणि तांत्रिक मानकांतील सातत्य अभावामुळे जळगावला अपेक्षित यश मिळाले नाही. आता ‘एआय’ आधारित प्रिसिजन फार्मिंगच्या माध्यमातून ही उणीव भरून काढण्याचा प्रयत्न होणार आहे.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल आणि अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी यांच्या संकल्पनेतून ही योजना आकारास आली आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डेटा अॅनालिटिक्सच्या मदतीने पिक व्यवस्थापन केले जाणार आहे. शेतात सेन्सरद्वारे मृदातील आर्द्रता, तापमान, हवामान व इतर घटकांचा डेटा संकलित केला जाईल. त्यावर आधारित अचूक सिंचन आणि खत व्यवस्थापनाचे नियोजन होईल.
तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि प्रात्यक्षिके
योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी Krishi Vigyan Kendra, बारामती व जळगाव येथील तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेतले जाणार आहे. निवडक शेतांवर प्रात्यक्षिके राबवून शेतकऱ्यांना प्रत्यक्ष अनुभव दिला जाईल. कार्यशाळा, प्रशिक्षण सत्रे, तांत्रिक सल्ला आणि नियमित फॉलोअप यांचा यात समावेश असेल. एआय प्रणालीद्वारे तयार होणारे अहवाल मोबाईल अॅप किंवा संदेशाद्वारे शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्याचाही विचार आहे.
उत्पादनात गुणवत्ता आणि सातत्य
या योजनेमुळे उत्पादनातील अनिश्चितता कमी होऊन गुणवत्तेत सुधारणा होईल. निर्यात निकषांनुसार फळांचा आकार, रंग, वजन आणि साठवण क्षमता सुधारण्यास मदत होईल. परिणामी, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत जळगावच्या केळीची मागणी वाढून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्याची अपेक्षा आहे.
योजनेचे प्रमुख घटक
स्वयंचलित हवामानावर आधारित सिंचन वेळापत्रक
मृदा तपासणी अहवालानुसार संतुलित खत व्यवस्थापन
ठिबक सिंचन व फर्टिगेशन प्रणाली
उच्च दर्जाच्या टिश्यू कल्चर केळी रोपांची लागवड
हिरवळीच्या खतांचा वापर करून मृदा सुपीकता वाढविणे
मल्चिंगद्वारे ओलावा संवर्धन
बड इंजेक्टर तंत्रज्ञानाद्वारे किड नियंत्रण
सूक्ष्म अन्नद्रव्यांची फर्टिगेशनमधून पूर्तता
बंच स्प्रे व स्कर्ट बॅगचा वापर करून दर्जा संरक्षण
मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी सांगितले की, जळगाव जिल्हा परिषदेच्या अधिकृत लोगोमध्ये केळीचा समावेश आहे. त्यामुळे या पिकाशी जिल्ह्याची ओळख घट्ट जोडलेली आहे. तांत्रिक आधुनिकीकरणाच्या माध्यमातून केळीला जागतिक दर्जा मिळवून देणे हा जिल्हा परिषदेचा दीर्घकालीन दृष्टीकोन आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---