---Advertisement---
राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघातापूर्वीचा शेवटचा फोन कॉल समोर आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. 28 जानेवारी रोजी मुंबईहून बारामतीकडे येत असताना लँडिंगदरम्यान त्यांच्या खासगी विमानाचा भीषण अपघात झाला होता. या दुर्घटनेत अजित पवारांसह पाच जणांचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर बारामती येथे आयोजित पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कार्यकर्ते व त्यांचे चुलत पुतणे श्रीजीत पवार यांनी महत्त्वाचा खुलासा केला. अपघाताच्या काही मिनिटे आधी अजित पवार यांच्याशी झालेल्या फोन संभाषणाची कॉल रेकॉर्डिंग त्यांनी प्रसारमाध्यमांसमोर सादर केली.
28 जानेवारी रोजी सकाळी 8.19 वाजता त्यांनी अजित पवारांना संदेश पाठवला होता. विमान प्रवासात नेटवर्क नसल्याने प्रतिसाद मिळाला नव्हता. मात्र, विमान बारामती परिसरात येताच सकाळी 8.37 वाजता अजित पवारांनी स्वतः फोन करून त्या संदेशावर चर्चा केली. या संभाषणात जिल्हा परिषद निवडणुकीतील उमेदवारीचा विषय चर्चेत होता. सर्व जाती-धर्मांना सोबत घेऊन न्याय देण्याची भूमिका आपण कायम ठेवणार असल्याचे अजित पवार यांनी या कॉलमध्ये स्पष्ट केल्याचे श्रीजीत पवार यांनी सांगितले. माळी समाजाला उमेदवारी दिल्याचा उल्लेख करत सामाजिक समतोल साधण्यावर त्यांनी भर दिला. हा फोन कॉल लँडिंगपूर्वी काही मिनिटेच झाला होता. सकाळी 8.37 वाजता कॉल आला त्यावर चर्चा झाली आणि अवघ्या नऊ मिनिटांनंतर म्हणजेच सकाळी 8.46 वाजता विमानाचा अपघात झाला. त्यामुळे हा संवाद अजित पवार यांचा अपघातापूर्वीचा शेवटचा फोन कॉल ठरला आहे.
दिवंगत अजित पवार यांचे चुलत पुतणे श्रीजीत पवार यांनी प्रसारित केलेली कॉल रेकॉर्डिंग:
https://youtube.com/shorts/FDT7EJuQcaU?feature=share
अजित पवार यांच्या अकाली निधनाने संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे. त्यांच्या राजकीय वाटचालीत सर्वसमावेशक विचारधारेवर दिलेला भर त्यांच्या शेवटच्या संभाषणातूनही स्पष्टपणे दिसून येतो, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
सदर कॉल रेकॉर्डिंग दिवंगत अजित पवार यांचे चुलत पुतणे श्रीजीत पवार यांनी प्रसारित केली आहे, तरुण भारत लाईव्ह या कॉल रेकॉर्डिंगची पुष्टी करत नाही.









