अमळनेर हादरलं! आठवड्याभरात ८ तरुणी बेपत्ता, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण, पोलिसांसमोर मोठं आव्हान

---Advertisement---

 

अमळनेर तालुक्यात गेल्या काही दिवसांत तरुण मुली बेपत्ता होण्याच्या घटनांमुळे परिसरात मोठी चिंता निर्माण झाली आहे. आठवडाभराच्या कालावधीत वेगवेगळ्या भागांतून एकूण आठ तरुणी गायब झाल्याची नोंद झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १९ तारखेला खडके परिसरातील १९ वर्षीय तरुणी रात्रीच्या सुमारास घरातील सर्वजण झोपेत असताना कोणालाही काही न सांगता बाहेर पडली आणि त्यानंतर तिचा काहीच पत्ता लागलेला नाही. त्याच्यानंतर दुसऱ्याच दिवशी, २० तारखेला पारधीवाडा भागातून आणखी एक १९ वर्षीय तरुणी दुपारच्या वेळेत बेपत्ता झाली. या दोन्ही घटनांचा तपास सध्या सुरू आहे.

२१ तारखेला एक २० वर्षीय तरुणी महाविद्यालयात जात असल्याचे सांगून घराबाहेर पडली; मात्र ती परतलीच नाही. बोरेसे गल्लीतील आणखी एक १९ वर्षीय तरुणी २४ तारखेला सकाळी साडेसातच्या सुमारास धनदायी महाविद्यालयासाठी निघाली होती, पण तीदेखील अद्याप घरी परतलेली नाही.

राजाराम नगर परिसरात १८ वर्ष पूर्ण होऊन अवघ्या १५ दिवसांतच एका तरुणीने २२ तारखेला दुपारी घर सोडले. तसेच २१ तारखेलाच देवळी परिसरातून एक १९ वर्षीय तरुणी बसस्थानकाजवळून अचानक गायब झाली.

दरम्यान, २५ तारखेला शिरुड नाका आणि शिवाजी नगर परिसरातील २० वर्षीय तरुणी ‘पेपर देऊन येते’ असे सांगून प्रताप महाविद्यालयात गेल्याचे सांगितले होते; मात्र तीही रात्रीपर्यंत परतली नाही. याशिवाय २२ वर्षीय आणखी एक तरुणी मैत्रिणीला भेटण्यासाठी बसस्थानकावर गेल्याचे सांगून बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे.

या सर्व घटनांमुळे पालकवर्ग चिंतेत असून शहरात असुरक्षिततेची भावना वाढीस लागली आहे. पोलिसांनी सर्व प्रकरणांचा वेगाने तपास सुरू केला असून बेपत्ता तरुणींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके कार्यरत केली आहेत. तरीही, वाढत्या घटनांमुळे कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---