---Advertisement---
जळगाव जिल्ह्यातील अमळनेर शहरात दिवसाढवळ्या घडलेल्या धाडसी लुटीच्या घटनेने व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पिंपळे रस्त्यावर एका व्यापाऱ्याच्या डोळ्यात मिरची फेकून तब्बल 5 लाख 27 हजार 200 रुपयांची रोकड लांबवण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे व्यापारी यतीन कोठारी हे रोकड रक्कम पिशवीत घेऊन स्कुटीवरून जात होते. त्यावेळी एकाच दुचाकीवरून आलेल्या तिघा अज्ञात आरोपींनी त्यांचा पाठलाग केला.
योग्य संधी साधत आरोपींनी अचानक त्यांच्या डोळ्यात मिरची फेकली. मिरचीमुळे व्यापारी गोंधळून गेले आणि काही क्षणातच आरोपींनी रोकड असलेली पिशवी हिसकावून पलायन केले. संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून त्यामध्ये तिघे आरोपी स्पष्ट दिसत आहेत.
प्राथमिक तपासात लूट करणारे आरोपी धुळे येथील असल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी आरोपींच्या घरापर्यंत धडक दिली, मात्र तोपर्यंत त्यांनी पैशांचा वाटा करून फरार झाल्याची माहिती समोर आली आहे.
सध्या पोलीस विविध पथकांच्या माध्यमातून आरोपींचा शोध घेत आहेत. लवकरच आरोपी जेरबंद केले जातील, असा विश्वास पोलिस प्रशासनाने व्यक्त केला आहे.
दरम्यान, या घटनेमुळे अमळनेर शहरात व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.









