राज्यात इंधनसाठा मुबलक; पुरवठा सुरळीत असल्याचा पुरवठा विभागाचा दावा

---Advertisement---

 

मुंबई : राज्यात काही ठिकाणी पेट्रोल-डिझेल भरण्यासाठी वाहनधारकांच्या रांगा लागल्याचे चित्र दिसत असले, तरी इंधनटंचाईची कोणतीही परिस्थिती नसल्याचा दावा राज्याच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने केला आहे. नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत शासनाने स्पष्ट केले की, पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचा पुरेसा साठा राज्यात उपलब्ध असून पुरवठा पूर्णपणे सुरळीत सुरू आहे.


शासनाच्या टास्कफोर्समार्फत संपूर्ण परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात असून, सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्या — हिंदुस्तान पेट्रोलियम (एचपीसीएल), भारत पेट्रोलियम (बीपीसीएल) आणि इंडियन ऑइल (आयओसीएल) — यांच्या माध्यमातून राज्यभर इंधन वितरण नियमितपणे सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.


२५ मार्च २०२६ रोजीच्या आकडेवारीनुसार, राज्यात पेट्रोलचा साठा 2,05,232 किलोलीटर, डिझेलचा साठा 4,67,603 किलोलीटर आणि एलपीजीचा साठा 30,767 मेट्रिक टन इतका उपलब्ध आहे. हा साठा राज्याच्या गरजा भागविण्यास पुरेसा असल्याचे विभागाने नमूद केले आहे.


तसेच, रिफायनरींकडून एलपीजी उत्पादनात वाढ करण्यात आली असून सर्व कंपन्या पूर्ण क्षमतेने कार्यरत आहेत. त्यामुळे इंधन पुरवठा साखळीत कोणताही अडथळा नसून वितरण यंत्रणा प्रभावीपणे काम करत असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.


खासगी क्षेत्रातील कंपन्यांकडेही पुरेसा साठा उपलब्ध असल्याने एकूण पुरवठा अधिक सक्षम झाला आहे. केंद्र व राज्य शासनाच्या समन्वयातून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यात येत असल्याचा दावा करण्यात आला आहे.


दरम्यान, काही ठिकाणी दिसणाऱ्या गर्दीमुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला असला, तरी घाबरून न जाता संयम राखावा आणि प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहनही विभागाने केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---