नागपूर : राज्यातील महायुती सरकारच्या मंत्रीमंडळ विस्तारात जळगाव जिल्ह्यातील तिघांचा समावेश करण्यात आला आहे. मागील मंत्रिमंडळात देखील जिल्ह्याला तीन मंत्रीपदे मिळाली होती. या तिघांपैकी भाजपचे नेते गिरीश महाजन व शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांना पुन्हा संधी देण्यात आली असून राष्ट्रवादीचे अनिल भाईदास पाटील यांना मंत्रिमंडळातून वगळण्यात आले आहे. याबाबत माजी मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
जळगाव जिल्ह्यातील अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल भाईदास पाटील यांना मंत्रीपद न दिल्याबद्दल त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. यावर बोलताना त्यांनी सांगितले की, मंत्रीपद मिळाले नसले तरी ते प्रामाणिकपणे आणि आनंदाने जनसेवेसाठी कार्य करत राहतील. त्यांना मंत्रीपद मिळेल, अशी अपेक्षा होती, मात्र पक्ष श्रेष्ठींनी घेतलेला निर्णय त्यांनी स्वीकारला असून, त्यावर कोणतीही नाराजी नाही, असेही ते म्हणाले. ते नागपूर येथे प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते.
आ. अनिल पाटील यांनी त्यांच्या कार्यकाळातील अनुभव शेअर करतांना सांगितले की, मदत व पुनर्वसन खात्याचा मंत्री असताना शेतकऱ्यांना डीबीटी (डायरेक्ट बेनेफिट ट्रांसफर) द्वारे नुकसान भरपाई दिली आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी त्यांनी नेहमी आक्रमक भूमिका घेतली. त्यांच्या कामाची पद्धत आणि प्रामाणिक प्रयत्नामुळे मंत्रीपद मिळण्याची अपेक्षा होती. परंतु, पक्षाने काही वरिष्ठ आमदारांना न्याय देण्यासाठी त्यांना मंत्रीपद देऊ नये असा निर्णय घेतला, असं ते मान्य करत आहेत.
त्यांनी यावर भर दिला की, मंत्रीपदाच्या अभावी त्याच्या कामकाजात कोणताही फरक पडणार नाही आणि आपल्या मतदारसंघात सुरू असलेली विकासकामे पूर्ण करण्यासाठी ते कटिबद्ध राहतील. अमळनेर विधानसभा मतदारसंघातील विकास कामांचा महत्त्वाचा टप्पा येणाऱ्या काळात पूर्ण केला जाईल, असा विश्वास आ. पाटील यांनी व्यक्त केला.