जळगाव : आमदार सुरेश भोळे यांनी शक्ती प्रदर्शन करत सोमवार २८ रोजी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी महायुतीतील पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. तत्पूर्वी आमदार भोळे यांचे जीएम फाउंडेशन येथे महिलांनी औक्षण केले. प्रथम शिवतीर्थ मैदानात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला खासदार स्मिता वाघ, आमदार सुरेश भोळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यानंतर जी.एम. फाउंडेशन येथून रॅलीस प्रारंभ करण्यात आला. या रॅलीत मंत्री ना. गिरीश महाजन तसेच पालकमंत्री गुलाबराव पाटील हे देखील रॅलीत सहभागी झाले.
आ. सुरेश भोळे यांच्या शक्ती प्रदर्शन रॅलीत थोरामोठ्यांसह महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. रॅलीमध्ये पक्षाच्या तसेच आमदार सुरेश भोळे यांच्या घोषणानी परिसर दुमदुमून गेला होता. नामांकन रॅली शिवतीर्थ चौक, नेहरू चौक, टॉवर चौक, प्रकाश मेडिकल चौक, बळीराम पेठ मार्गे वसंत स्मृती कार्यालय, भाजप येथे विसर्जित करण्यात आली. नामांकन रॅलीचे सभेमध्ये रूपांतर झाले. यावेळी, खा. स्मिता वाघ, आमदार सुरेश भोळे, माजी महापौर सिमा भोळे, आमदार लता सोनवणे, भाजपा जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर जळकेकर महाराज, राष्ट्रवादीचे निलेश पाटील, अभिषेक पाटील, आरपीआय (आठवले)गटाचे अनिल अडकमोल, लल्लन सपकाळे, भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष उज्वला बेंडाळे यांच्यासह भाजपा, राष्ट्रवादी अजित पवार गट, आरपीआय आठवले गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शक्ती प्रदर्शन रॅलीच्या समारोपानंतर आमदार सुरेश भोळे यांनी आपले नामांकन पत्र दाखल केले. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला, ते म्हणाले की, गेल्या दहा वर्षात मी जनतेचे 50 टक्के कामे केलेली आहेत. 25 टक्के कामे पाईपलाईनमध्ये आहे व उरलेले 25 टक्के काम या विजयानंतर होणार आहे. जनतेला अपेक्षा असलेला 24 तास उपलब्ध असलेल्या सेवक असल्यामुळे आज जनतेने या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले आहे. या जनतेच्या आशीर्वादानेच आमचा विजय निश्चित असल्याचा विश्वास आ. भोळे यांनी व्यक्त केला.