अडावद : चोपडा विधानसभा मतदारसंघात निवडणूकीच्या प्रचाराचे वारे जोरात वाहू लागले आहेत. त्यामुळे प्रचारासाठी मिळालेल्या मोजक्या दिवसात संपूर्ण मतदार संघाचा परिसर पिंजून काढण्यासाठी सर्वच प्रमुख उमेदवारांची लगबग सुरु आहे. या प्रचाराच्या रणधुमाळीत कपाट चिन्हावर निवडणूक लढविणारे व अडावद येथील स्थानिक भूमिपुत्र म्हणून हाक देवून रिंगणात उतरलेले अपक्ष उमेदवार संभाजी मंगल सोनवणे यांनी येथील इंदिरा नगर प्लॉट भागातील हनुमान मंदिरात नारळ फोडून आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला.
संभाजी सोनवणे यांनी वाजतगाजत काढलेल्या प्रचार रॅली दरम्यान भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, पूर्वमुखी हनुमान मंदिर, संत गोरोबा काका, संत भीमा भोई, आद्यकवी महर्षि वाल्मिकी यांच्या प्रतिमेला अभिवादन करुन दुर्गादेवी चौकात दुर्गामातेला नारळ वाहून प्रचारास सुरुवात केली. यानंतर त्यांनी
मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या. यावेळी दिलीप कोष्टी, प्रताप सोनवणे, गणेश सैंदाणे, जानकीराम कोळी, लोटन कुंभार, सागर पाटील, भूषण कोळी, रविंद्र भोई, संजय शिरसाठ, रमेश बाविस्कर आदींसह बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.