Assembly Election 2024 : पोलिसांकडून ६ आंतरराज्य, ९ आंतरजिल्हा तपासणी नाक्यांवर वाहनांची होणार तपासणी

जळगाव : विधानसभा निवडणूक आचारसंहिता लागू झाली आहे. या निवडणुकीच्या काळात जिल्ह्यातून बाहेर जाणाऱ्या तसेच अन्य राज्य वा जिल्ह्यातून येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांची तपासणी केली जात आहे. यात ६ आंतरराज्य, तर ९ आंतरजिल्हा नाके (चेकपोस्ट) उभारण्यात आले आहेत. या सीमा नाक्यांवरून जिल्ह्यात येणाऱ्या व जाणाऱ्या वाहनांवर पोलिसांची बारीक नजर राहणार आहे. या शिवाय कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्यासह वाढीव बंदोबस्ताचेही नियोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिली.


जिल्ह्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक शांततेत पार पडल्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनासह
पोलीस प्रशासनाकडून कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. या निवडणुकीत कोणताही गैरप्रकार घडू नये, यासाठी पोलीस प्रशासनाकडून अगोदरच नियोजन करण्यात आले आहे. जळगाव जिल्ह्यालगतच मध्य प्रदेश राज्य सीमा आहे. या सीमेवर सहा तपासणी नाके उभारण्यात आले आहेत.

पाच हजार तीनशेहून अधिक अतिरिक्त पोलीस, होमगार्ड बल
जिल्ह्यात ११ विधानसभा मतदारसंघ असून विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ जाहीर झाली आहे. जिल्ह्यात आठ उपविभागीय पोलीस अधिकारी असून विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बाहेरून वाढीव बंदोबस्त मागविण्यात आला आहे. यात तीन उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच ५५ सहायक पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक, दोन हजार १८९ पोलीस शिपाई, तीन हजार ५५ होमगार्ड मागविण्यात आले आहेत.

पाच एसआरपी, नऊ सीआरपी तुकड्या दाखल
राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी एकाच टप्प्यात मतदान होत आहे. त्यामुळे नियमित अधिकारी व त्यामुळ पोलीस बंदोबस्तात निवडणुकीचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी राज्य राखीव पोलीस दलाच्या (एसआरपीएफ) पाच, केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) नऊ तुकड्या दाखल होत आहेत. यापैकी सीआरपीएफच्या तीन तुकड्या गत सप्ताहात दाखल झाल्या आहेत.

उपद्रवी समाजकंटक रडारवर
विधानसभा निवडणुकीदरम्यान कायदा सुव्यवस्थेसह निवडणूक मतदान प्रक्रिया शांततेत पार पडावी, यासाठी पोलीस दलाने प्रतिबंधात्मक कारवाईचे अस्त्र उगारले आहे. यात जिल्ह्यातील साडेतीन हजारांहून अधिक उपद्रवी पोलिसांच्या रडारवर आहेत. यात बीएनएस कलम १२६ नुसार तीन हजार, १२९ नुसार ४५० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई प्रस्तावीत आहे. तसेच ५५ जणांचा तडीपारचा तर आठ जणांवर स्थानबद्धतेचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.

परवानाधारक शस्त्रे जमा करण्याचे आदेश
जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीवेळीच एक हजार ४५ जणांनी शस्त्रे जमा केली होती. त्यानंतर मोजक्याच जणांनी ते परत नेले आहेत. सध्या विधानसभा निवडणूक घोषित झाली असून त्या पार्श्वभूमीवर निवडणुकीदरम्यान ज्या ९४५ जणांकडे शस्त्र परवाने असले तरी ज्या परवानाधारकांना शस्त्रे परत देण्यात आली, त्यांच्याकडील शस्त्रे पुन्हा जमा करण्यात येणार आहेत.

जिल्ह्यांच्या सीमांवर पोलिसांची करडी नजर
निवडणूक आचारसंहिता लागल्यापासून ते निकाल जाहीर होईपर्यंत मद्य, रोकड, मौल्यवान धातू अथवा तत्सम कोणत्याही संशयास्पद वस्तू इतर ठिकाणाहून जिल्ह्यात येऊ नये, यासाठी तपासणी नाक्यांवर तपासणी केली जात आहे. याशिवाय जळगाव जिल्ह्याला लागून खान्देशातील धुळे जिल्ह्यासह, मराठवाडा, विदर्भाच्या जिल्ह्यांच्या सीमांवर पोलिसांची नजर राहणार आहे.