जळगाव : भारत निवडणूक आयोगाने राज्यातील विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यानुसार २० नोव्हेंबर रोजी मतदान पार पडणार आहे. निवडणुकीत जास्तीत जास्त लोकांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा याकरीता २० नोव्हेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. परंतु, राज्यात मतदानाच्या दिवशी शाळांना सुट्टी असली, तरी मतदानाच्या आधी २ दिवस सुट्टीवरुन शाळा व्यवस्थापन, पालकांमध्ये याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. शिक्षण विभागाने यासंदर्भात एक परिपत्रक जाहीर करत सर्व गोंधळ दुर केला आहे. शासन आदेशानुसार राज्यात १८ आणि १९ नोव्हेंबरला शाळा सुरूच राहणार आहेत. शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी एका परिपत्रकाद्वारे याबाबत माहिती दिली आहे.
शिक्षण विभागाने जारी केलेल्या परिपत्रकामुळे राज्यात चार दिवस शाळांना सुट्टी असल्याचा संस्थाचालकांत संभ्रम निर्माण झाला, मात्र याबाबत आयुक्त कार्यालयाकडून स्पष्टीकरण नसल्याने राज्यभरात सुट्टीचा गोंधळ दिसून आला. हा गोंधळ दूर करताना राज्यात १८ आणि १९ नोव्हेंबरला शाळा सुरूच राहणार असल्याचे स्पष्टीकरण शुक्रवारी शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी दिले.
शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी काढलेल्या परिपत्रकानुसार १८ व २० नोव्हेंबर रोजी म्हणजेच मतदानाच्या २ दिवस आधी शाळांना कोणतीही सार्वत्रिक सुट्टी जाहीर करण्यात आलेली नाही. केवळ ज्या शाळेतील सर्व शिक्षकांची नियुक्ती निवडणूक कामासाठी झाल्यामुळे एकही शिक्षक शाळेत उपलब्ध असणार नाही, अशा शाळांबाबत स्थानिक स्तरावर मुख्याध्यापतक यांनी त्यांच्या अधिकारात सुट्टी जाहीर करावी. अशा शाळा वगळता उर्वरित सर्व शाळा नियमितपणे सुरु राहतील. विशिष्ट शाळांना स्थानिक पातळीवर मुख्याध्यापक यांनी सुट्टी जाहीर करावी. तसेच ही सरसकट व सार्वजनिक सुट्टी नाही याची नोंद सर्वांनी घेऊन कोणत्याही शाळा अनावश्यकरित्या बंद राहणार नाहीत याची दक्षता घेण्याचे आवाहन शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी केले आहे.