जळगाव : केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र राज्यातील विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ चा कार्यक्रम जाहीर केला आहे. यानुसार मतदान २० नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात पार पडणार आहे. निवडणुकीत जास्तीत जास्त लोकांना आपला मतदान हक्क बजावता यावा या करीता त्या दिवसासाठी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. विधानसभा मतदारसंघातील मतदारांना मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी सुट्टी देण्यात यावी असा आदेश कार्यसन अधिकारी शामकांत सोनवणे यांनी एका परित्रकाद्वारे दिला आहे.
निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रातील कोणत्याही व्यवसायात, व्यापारात, औद्योगिक उपक्रमात किंवा इतर कोणत्याही आस्थापना तसेच उद्योग विभागांतर्गत येणा-या सर्व उद्योग समूह, महामंडळे, कंपन्या व संस्था, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापनेमध्ये कार्यरत असलेल्या आणि राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीत मतदान करण्याचा अधिकार असलेल्या प्रत्येक व्यक्तीला, मतदानाच्या दिवशी सुट्टी दिली जाणार आहे. सुट्टीच्या कारणास्तव कोणत्याही व्यक्तीच्या वेतनात कोणतीही कपात केली जाणार नाही. जर एखाद्या नियोक्त्याने या तरतुदींचे उल्लंघन केले, तर असा नियोक्ता निवडणूक आयोगाच्या नियमानुसार शिक्षेस पात्र असणार आहे. हे कलम अशा कोणत्याही मतदाराला लागू होणार नाही ज्यांच्या अनुपस्थितीमुळे तो ज्या रोजगारामध्ये गुंतला आहे त्या रोजगाराच्या संदर्भात धोका किंवा मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते.
अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचारी इत्यादींना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर, मतदान क्षेत्रातील सुट्टी ऐवजी कमीत कमी दोन तासांची सवलत देण्यात यावी. मात्र, यासाठी त्याबाबत संबंधित जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांची पूर्व परवानगी घेणे आवश्यक असणार आहे. मतदारांकडून मतदानाकरिता योग्य ती सुट्टी अथवा सवलत प्राप्त न झाल्याने मतदान करता येणे शक्य न झाल्याबाबत तक्रार आल्यास, त्यांच्याविरुद्ध योग्य कारवाई करण्यात येणार असल्याचे परिपत्रकात म्हटले आहे.