---Advertisement---
गंभीर आजाराशी झुंजणाऱ्या आर्थिक दुर्बल आणि गरजू रुग्णांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीद्वारे ठोस आधार मिळाला आहे. नाशिक विभागांतर्गत १ जानेवारी ते ३१ जुलै २०२५ दरम्यान ३ हजार ५४२ रुग्णांना एकूण ३२ कोटी ३२ लाख ५ हजार रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे. तर जळगाव जिल्ह्यात ७९५ रुग्णांना ६ कोटी ९९ लाख ४५ हजार रुपयांची सहाय्य मदत देण्यात आली असून रुग्णांच्या उपचारासाठी दिलेली मदत जीवनदायिनी ठरत असल्याचे दिसून आले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षात पेपरलेस व डिजिटल प्रणालीची अंमलबजावणी झाली आहे. रुग्ण तसेच त्यांच्या नातेवाईकांना मंत्रालयात न येता जिल्हास्तरावरच मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष कार्यान्वित झाला असल्यामुळे सुलभ अर्ज प्रक्रिया, कमी वेळेत रुग्णांना अचूक आणि पारदर्शकरित्या मदतीचा लाभ मिळाला आहे.
मुख्यमंत्री सहाय्यता निधी अंतर्गत कॉक्लियर इम्प्लांट (वय २६ वर्षे), हृदय, किडनी, यकृत, फुफ्फ स, बोन मॅरो प्रत्यारोपण, कर्करोग, अपघात, मेंदूचे आजार, नवजात शिशूच्या आजारांवरील उपचार, भाजलेले व विद्युत अपघातग्रस्त रुग्ण यांसारख्या २० गंभीर आजारांवर उपचारासाठी आर्थिक सहाय्य दिले जाते. गरजू रुग्णांना आवश्यक त्या उपचारांची मदत वेळेत आणि त्यांच्या आवाक्यात मिळावी, हा या योजनेचा उद्देश असून या योजनेद्वारे जळगाव जिल्ह्यातील शेकडो कुटुंबांना आरोग्यसेवेसाठी दिलासा मिळाला असून, अनेक रुग्णांना वेळेवर उपचार घेता आले आहेत. ही योजना गरजूंना नवजीवन देणारी ठरत आहे.
मदतीसाठी आधार कार्ड, रेशन कार्ड, वार्षिक १ लाख ६० हजार रूपयांच्या आत उत्पन्न दाखला, वैद्यकीय अहवाल, खर्चाचे प्रमाणपत्र,
जिओ-टॅग फोटो (रुग्ण दाखल असल्यास अनिवार्य), संबंधित रुग्णालयाची संगणक प्रणालीवरील नोंद, अपघातप्रकरणी पोलीस डायरीची नोंद आणि अवयव प्रत्यारोपणप्रसंगी नोंदणी पावती आदी आवश्यक कागदपत्रे तयार करून [email protected] या ईमेल पत्त्यावर पाठवावीत. अधिक माहितीसाठी टोल-फ्री क्रमांक १८०० १२३ २२११ वर संपर्क साधता येईल.