---Advertisement---
---Advertisement---
जळगाव : जागतिक व्याघ्र दिनाच्या पूर्वसंध्येवर वन्यजीव संरक्षण संस्था, जळगाव आणि यावल वनविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित व्याघ्र संवर्धन जनजागृती रॅलीस आज सोमवर (२८ जुलै) रोजी जळगाव येथून उत्साहात प्रारंभ झाला. या रॅलीला आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ करण्यात आला.
उप वनसंरक्षक जमीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेल्या या दोन दिवसांच्या रॅलीमध्ये राज्यभरातून आलेले १०० व्याघ्रदूत आणि विवेकानंद प्रतिष्ठानचे २५ विद्यार्थी सहभागी झाले आहेत. रॅलीस विद्यार्थ्यांमध्ये विशेष उत्साह दिसून आला असून यावल वनविभागाकडून त्यांना जंगल सफारीचा अनुभव देण्यात येणार आहे. नशिराबाद, भुसावळ, सावदा, फैजपूरमार्गे पाल या ठिकाणी २९ जुलै रोजी हा जनजागृती कार्यक्रम घेण्यात येणार आहे.
रॅली दरम्यान “वाघ वाचवा, जंगल वाचवा” असा संदेश देत विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले. जंगलाच्या प्रतिकृतीसारख्या सजवलेल्या सफारी वाहनावर उभे असलेले दोन मानवी वाघ विशेष आकर्षण ठरले. नागरीकांनी या मानवी वाघांसोबत सेल्फी काढून रॅलीचे स्वागत केले.
बाळकृष्ण देवरे यांनी सूत्रसंचालन केले. संस्थेचे उपाध्यक्ष मुकेश सोनार, सतीश कांबळे यांनी संस्थेच्या कार्याची माहिती दिली. यावल वनविभागाचे सहाय्यक वनसंरक्षक समाधान पाटील यांनी आभार मानले.
मंगळवारी (२९ जुलै) रोजी पाल येथे विवेकानंद प्रतिष्ठानच्या शानबाग विद्यालयातील विद्यार्थ्यांना जंगल सफारी टी-शर्ट वाटप, दुर्गम भागातील आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांना व वनमजुरांना चटई वाटप, वृक्षारोपण व बिजारोपण यासारखे कार्यक्रम उप वनसंरक्षक जमीर शेख यांच्या हस्ते पार पडणार आहेत. अशी माहिती सचिव योगेश गालफाडे यांनी दिली.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी यावल वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच वन्यजीव संस्थेचे रवींद्र फालक, बाळकृष्ण देवरे, योगेश गालफाडे, सतीश कांबळे, मुकेश सोनार यांच्यासह राज्यातील विविध जिल्ह्यांतील स्वयंसेवी संस्था, ट्रेकर्स ग्रुप आणि वन्यजीवप्रेमी कार्यरत आहेत.