---Advertisement---
जळगाव शहराजवळील मन्यारखेडा गावात उभारण्यात आलेल्या ‘ग्रह, राशी आणि नक्षत्र’ यांवर आधारित आगळ्यावेगळ्या मंदिराचा मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा दिनांक 2 एप्रिल रोजी अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडला. या ऐतिहासिक सोहळ्यामुळे परिसरात धार्मिक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
या सोहळ्यात अमळनेर येथील प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री सखाराम महाराज संस्थानचे गादीपती ह.भ.प. श्री प्रसादजी महाराज यांच्या हस्ते मंदिराच्या शिखरावर विधिवत कलशारोहण करण्यात आले. पहाटेपासूनच मंदिरात पूजा, होम-हवन, मंत्रोच्चार आदी धार्मिक विधींना सुरुवात झाली होती.
या वेळी मंदिराचे गादीपती प.पू. स.गु. मयूरगोविंदजी महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती. सोहळ्यासाठी मन्यारखेडा परिसरासह संपूर्ण जळगाव जिल्ह्यातून हजारो भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.
मंदिराचे वैशिष्ट्य ठरते आकर्षण
ग्रह, राशी आणि २७ नक्षत्रांच्या संकल्पनेवर आधारित हे मंदिर जगातील एकमेव असल्याचा दावा करण्यात येत आहे. धार्मिक श्रद्धा आणि खगोलशास्त्र यांचा संगम असलेल्या या मंदिरामुळे भविष्यात पर्यटनालाही चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.









