अजिंठा लेणीत मधमाशांचा हल्ला! अचानक पर्यटकांची पळापळ; ११ जण जखमी…!

---Advertisement---

 

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जागतिक वारसा स्थळ अजिंठा लेणी परिसरात पुन्हा एकदा मधमाशांच्या हल्ल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बुधवारी एकाच दिवशी दोन वेळा झालेल्या हल्ल्यात एकूण ११ पर्यटक जखमी झाले असून, परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, लेणी परिसरात पर्यटकांची मोठी गर्दी असताना अचानक मधमाशांनी हल्ला चढवला. सकाळच्या सुमारास लेणी क्रमांक १० जवळील मोहळातून मधमाशा बाहेर पडल्या आणि त्यांनी पर्यटकांवर हल्ला केला. या घटनेनंतर सुमारे तासाभराने लेणी क्रमांक २६ परिसरात पुन्हा अशीच घटना घडली.

या दोन्ही हल्ल्यांमध्ये देश-विदेशातून आलेल्या पर्यटकांना मधमाशांनी चावा घेतल्याने ते जखमी झाले. जखमींना तातडीने उपचारासाठी हलवण्यात आले.

दरम्यान, गेल्या दोन महिन्यांतील ही पाचवी घटना असल्याने पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. वारंवार होणाऱ्या अशा घटनांमुळे विशेषतः महिला आणि लहान मुलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ असतानाही मधमाशांच्या मोहळांवर कायमस्वरूपी उपाययोजना का केल्या जात नाहीत, असा सवाल उपस्थित केला जात आहे. संबंधित यंत्रणांनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.

प्रशासनाकडून पर्यटकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले असून, गडद रंगाचे कपडे टाळावेत तसेच सुगंधी द्रव्यांचा वापर करू नये, असेही सांगण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---