---Advertisement---
नंदुरबार : तालुक्याच्या पूर्व भागातील बलवंड परिसरातून हंगामी रोजगारासाठी स्थलांतरीत झालेल्या ऊसतोड कामगार महिला लाडकी बहिणी योजनेला मुकणार आहेत. सप्टेंबर महिन्यापासून पश्चिम महाराष्ट्रातील कारखान्यांमध्ये मजुरीसाठी गेलेल्या महिलांची केवायसी झाली नसल्याने त्यांचा लाभ बंद झाला आहे. या महिला मार्चमध्ये परत आल्यापासून केवायसी करण्याचा प्रयत्न करीत आहेत.
राज्यात लाडकी बहीण योजनेंतर्गत महिला लाभार्थीच्या खात्यांची केवायसीचे काम सुरू असून ३० एप्रिलपर्यंत महिला लाभार्थीना केवायसी करता येणार आहे. दरम्यान, ही मुदत संपण्यासाठी काही दिवसांचाच अवधी असून नंदुरबार तालुक्याच्या पूर्व भागातील महिला लाभार्थीच्या वाट्याला मात्र योजनेपासून वंचित राहण्याची वेळ येणार आहे. या महिलांनी केवायसी करण्यासाठी सीएससी सेंटर तसेच इतर ठिकाणी धाव घेतली. मात्र, त्यांची केवायसी झालेली नसल्याने महिला त्रस्त झाल्या आहेत.
केवायसीअभावी बलवंड गावातील २०० महिलांचे या योजनेचे पैसे बंद झाल्याची माहिती समोर आली असून रोजगार कमावून परतताच केवायसीसाठी धडपड सुरू आहे.
पूर्व भागातील बलवंड, रजाळे या भागातील अनेक कुटुंब गेल्या वर्षीच्या सप्टेंबर महिन्यापासून पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, बारामती, शिरूर कोल्हापूर या भागातील साखर कारखान्यांमध्ये मजुरीसाठी गेली होती. ऊसतोडीसह इतर शेतीकाम ांसाठी गेलेली ही कुटुंबे मार्चअखेरीस परत आल्यानंतर काही लाभार्थी महिलांनी जानेवारी महिन्यापासून शिल्लक असलेला हप्ता काढता यावा म्हणून बँकेत धाव घेतली. परंतु, केवायसी नसल्याने त्यांच्या खात्यावर पैसे वर्ग झालेले नाहीत. मात्र मुदत संपण्यासाठी काही दिवसांचा अवधी असताना या महिला लाभार्थीच्या वाट्याला मात्र योजनेपासून वंचित राहण्याची वेळ येत असल्याचे चित्र आहे.









