---Advertisement---
जळगांव महिला व बालकांच्या सुरक्षिततेसाठी तसेच त्यांच्या तक्रारींचे तत्पर निवारण करण्याच्या उद्देशाने जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या ‘भरोसा सेल व समुपदेशन केंद्र’ या नवीन इमारतीचे भूमिपूजन दिनांक 8 मार्च रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या परिसरात उत्साहात पार पडले.
या इमारतीचे भूमिपूजन जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या प्रास्ताविकाने झाली. त्यांनी या केंद्राच्या उभारणीमागील उद्देश स्पष्ट करताना पीडित महिला व बालकांना एकाच छताखाली कायदेशीर मदत, मानसिक समुपदेशन व पोलीस सहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी हे केंद्र महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे सांगितले.
यावेळी अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे, पोलीस निरीक्षक सतीश गोराडे, पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड तसेच जळगाव शहरातील सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी व पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांनी केले.
दरम्यान, या प्रकल्पासाठी जिल्हा नियोजन समिती (DPDC) निधीतून २९७ लाख रुपयांच्या अंदाजपत्रकास मंजुरी देण्यात आली आहे. इमारतीचे बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या देखरेखीखाली करण्यात येणार असून कार्यकारी अभियंता राहुल दे. पाटील आणि उपविभागीय अधिकारी सुनिल देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली मे. जगन्नाथ इन्फ्रा कंपनी, चाळीसगाव यांच्या माध्यमातून हे काम पूर्ण केले जाणार आहे.
जळगाव पोलीस दलाचा हा उपक्रम सामाजिक सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार असून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी या सकारात्मक पुढाकाराचे विशेष कौतुक केले.









