---Advertisement---
जळगाव (प्रतिनिधी) – “मी मंत्री आहे म्हणून राजा नाही, शेतकऱ्यांची सेवा हीच माझ्यासाठी सर्वोच्च आहे,” असे स्पष्ट मत व्यक्त करत केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी जळगाव दौऱ्यात शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला. गुढीपाडव्याच्या निमित्ताने त्यांनी उपस्थित सर्व शेतकऱ्यांना मराठीत शुभेच्छा देत त्यांच्या समस्या प्रत्यक्ष ऐकून घेतल्या.
मंत्रालयात बसून केवळ अधिकाऱ्यांशी चर्चा करून धोरण ठरवले तर ते शेतकऱ्यांच्या हिताचे ठरणार नाही, त्यामुळेच प्रत्यक्ष शेतकऱ्यांशी संवाद साधण्याचा निर्णय घेतल्याचे चौहान यांनी सांगितले. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या विविध अडचणी जाणून घेत त्यावर उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले.
केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा करत चौहान म्हणाले की, केळी पिकासाठी 200 कोटी रुपयांच्या निधीतून क्लस्टर प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली असून त्याची अंमलबजावणी लवकरच होणार आहे. या क्लस्टरच्या माध्यमातून सुमारे पाच कोटी केळीच्या रोपांची निर्मिती केली जाणार असून, केळीवर आधारित प्रक्रिया उद्योगांना चालना मिळणार आहे.
केळीवरील रोग नियंत्रणासाठी स्वतंत्र संशोधकांची टीम तयार केली जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. तसेच शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या सबसिडीबाबत घेतलेले निर्णय काटेकोरपणे अंमलात आणण्याचे आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आले.
दरम्यान, बाजारात गडबड करून अचानक दर घसरवणाऱ्या व्यापाऱ्यांच्या लॉबीविरोधात कठोर कारवाईचा इशाराही कृषिमंत्र्यांनी दिला. अशा व्यापाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी विशेष यंत्रणा उभी करून कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
“प्रत्येक समस्या लगेच सोडवण्याचे आश्वासन देत नाही, मात्र शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन,” अशी ग्वाही देत चौहान यांनी शेतकऱ्यांचा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न केला.









