---Advertisement---
तमिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस पक्षाला मोठा राजकीय धक्का बसला आहे. विरुधुनगरचे खासदार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिकम टागोर यांनी पक्षाच्या तमिळनाडू निवडणूक व्यवस्थापन आणि समन्वय समितीच्या अध्यक्षपदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. राज्यातील जागावाटपावर उघडपणे नाराजी व्यक्त करत त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतल्याचे समजते.
जागावाटपावरून संघर्षाची ठिणगी
काँग्रेसने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी डीएमके (DMK) सोबत युती केली आहे. मात्र, या युतीमध्ये काँग्रेसच्या वाट्याला केवळ २८ जागा आल्याने पक्षातील अनेक दिग्गज नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या विद्यमान १८ जागांपैकी दोन जागा डीएमकेकडे गेल्या आहेत. तसेच, पूर्वी एआयएडीएमकेच्या (AIADMK) बालेकिल्ला असलेल्या सात पारंपारिक जागा काँग्रेसला देण्यात आल्या आहेत, जिथे विजय मिळवणे पक्षासाठी मोठे आव्हान ठरणार आहे.
खर्गे यांच्याकडे सोपवला राजीनामा
मणिकम टागोर हे गेल्या काही काळापासून डीएमके युतीमध्ये काँग्रेसला सन्मानजनक आणि अधिक जागा मिळाव्यात, अशी ठाम भूमिका मांडत होते. मात्र, अपेक्षेपेक्षा अत्यंत कमी जागा मिळाल्याने त्यांनी आपली नाराजी व्यक्त करत थेट काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे आपला राजीनामा सादर केला आहे. ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत एका ज्येष्ठ खासदाराने राजीनामा दिल्याने तमिळनाडूच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
निवडणुकीचे वेळापत्रक
दरम्यान, २०२६ च्या तमिळनाडू विधानसभा निवडणुकीसाठी २३ एप्रिल रोजी संपूर्ण राज्यात एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. सकाळी ७ ते संध्याकाळी ६ या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडणार असून, या निवडणुकीचा निकाल ४ मे २०२६ रोजी जाहीर होणार आहे.









