---Advertisement---
शुक्रवारी, १३ मार्च रोजी भारतीय शेअर बाजाराची सुरुवात मोठ्या घसरणीसह झाली. प्रमुख निर्देशांक बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी ५० लाल निशाणावर उघडले. बाजारात सुरुवातीच्या व्यवहारातच सुमारे ६४५ अंकांची घसरण झाल्याने गुंतवणूकदारांना मोठा धक्का बसला.
सकाळी सुमारे साडेदहाच्या सुमारास सेन्सेक्स ५६६ अंकांनी घसरून ७५,४६७ या पातळीवर व्यवहार करत होता. तर निफ्टी ५० देखील १८५ अंकांच्या घसरणीसह २३,४५३ या पातळीवर ट्रेड करताना दिसला.
दरम्यान, अमेरिका-इस्रायल-इराण या देशांमधील वाढत्या युद्धसदृश्य परिस्थितीचा परिणाम आता जागतिक बाजारांवरही दिसू लागला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढत असल्याने महागाई वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर आशियाई शेअर बाजारांमध्येही घसरण पाहायला मिळाली.
दक्षिण कोरियाचा कोस्पी निर्देशांक सुमारे ३ टक्क्यांनी खाली आला. जपानचा निक्केई २२५ निर्देशांक जवळपास २ टक्क्यांनी घसरला, तर टॉपिक्स निर्देशांकात सुमारे १.४ टक्क्यांची घसरण झाली. तसेच हाँगकाँगचा हँग सेंग निर्देशांकही कमकुवत सुरुवातीचे संकेत देताना दिसला.
गुरुवारी देखील भारतीय शेअर बाजारात घसरणीचा कल कायम होता. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांक लाल निशाणावर बंद झाले होते. जागतिक घडामोडी आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे गुंतवणूकदारांमध्ये सध्या सावधगिरीचे वातावरण निर्माण झाले आहे.









