---Advertisement---
इराण आणि अमेरिका यांच्यात युद्धविराम होऊन झालेल्या शांतता कराराच्या घोषणेनंतर भारतीय शेअर बाजारात मोठी तेजी पाहायला मिळाली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हॉर्मुज सामुद्रधुनीजवळील आपले सैन्य हटवण्यास मंजुरी दिल्याचे सांगितल्यानंतर जागतिक बाजारात सकारात्मक वातावरण निर्माण झाले.
जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींवरही परिणाम झालेला दिसून येतो. ब्रेंट क्रूडच्या किंमती 4 टक्क्यांहून अधिक घसरून 83 डॉलरच्या आसपास आल्या. यामुळे महागाईवर नियंत्रण येण्यास मदत होऊ शकते. तसेच पेट्रोल आणि डिझेलच्या दरातही भविष्यात दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
भारतीय शेअर बाजाराने जोरदार सुरुवात केली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स बाजार उघडताच 1,100 हून अधिक अंकांनी वाढून 76 हजारांच्या पुढे गेला. तर निफ्टीमध्ये 330 हून अधिक अंकांची वाढ झाली. मागील शुक्रवारी सेन्सेक्स 1,695 अंकांच्या वाढीसह 75,527.95 वर, तर निफ्टी 461 अंकांच्या वाढीसह 23,622.90 वर बंद झाला होता.
बीएसईमधील सर्व 30 प्रमुख कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ दिसून आली. सर्वाधिक वाढ IndiGo (4.05%), L&T (3.60%), Bajaj Finance (3.56%), Eternal (3.40%) आणि Adani Ports (3.80%) या शेअर्समध्ये नोंदवली गेली.
आशियातील इतर बाजारांनीही दमदार कामगिरी केली. जपानचा निक्केई, हाँगकाँगचा हँगसेंग आणि दक्षिण कोरियाचा कोस्पी निर्देशांक वाढीसह व्यवहार करत होते. गिफ्ट निफ्टीही 400 हून अधिक अंकांनी वाढून 24 हजारांच्या पुढे पोहोचला.









