---Advertisement---
मुंबई: राज्यातील नागरिकांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय घेत, मुंबईत मिळकतीचे (प्रॉपर्टी) फेरफार आता ऑनलाईन करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही महत्त्वाची माहिती दिली. या निर्णयामुळे नागरिकांना सरकारी कार्यालयांच्या फेऱ्या माराव्या लागणार नाहीत आणि प्रक्रिया अधिक पारदर्शक व जलद होणार आहे.
दरम्यान, आरोग्य क्षेत्रातही सरकारने कडक भूमिका घेतली आहे. गरीब आणि मध्यमवर्गीयांसाठी वरदान ठरलेल्या महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत रुग्णालयांकडून होणाऱ्या गैरप्रकारांवर सरकारने इशारा दिला आहे.
सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधानसभेत सांगितले की, या योजनांमध्ये समाविष्ट असलेल्या रुग्णालयांनी जर गरजू रुग्णांना मोफत उपचार दिले नाहीत, तर संबंधित रुग्णालयांवर चौकशी करून कडक कारवाई केली जाईल. हा मुद्दा आमदार अभिजित पाटील यांनी उपस्थित केला होता.
मंत्री आबिटकर म्हणाले की, या दोन्ही योजना सर्वसामान्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असून, नागरिकांना मोफत आणि दर्जेदार आरोग्य सेवा देणे हा सरकारचा उद्देश आहे. मात्र, काही रुग्णालयांकडून रुग्णांना योजना उपलब्ध नसल्याचे सांगून परत पाठवले जाते किंवा औषधे बाहेरून आणण्यास भाग पाडले जाते, अशा तक्रारी समोर आल्या आहेत.
या तक्रारींची गंभीर दखल घेत शासनाने संबंधित रुग्णालयांवर लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. गरजू नागरिकांना पाच लाखांपर्यंतचा खर्च या योजनांतर्गत मिळत असताना देखील त्यांना त्रास दिला जात असल्यास ते सहन केले जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या निर्णयामुळे एकीकडे प्रशासन अधिक डिजिटल आणि सुलभ होणार असून, दुसरीकडे आरोग्य योजनांचा लाभ खऱ्या अर्थाने गरजूंपर्यंत पोहोचेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.









