---Advertisement---
चेतन साखरे
जळगाव : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी नंदुरबार जिल्ह्याच्या प्रभारी म्हणून केंद्रीय मंत्री रक्षा खडसे, नाशिक जिल्हा प्रभारी म्हणून मंत्री गिरीश महाजन आणि जळगाव जिल्हा प्रभारी म्हणून मंत्री संजय सावकारे यांच्यावर जबाबदार सोपविण्यात आली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी भाजपाने जोरदार रणनिती आखली आहे. या निवडणुकांसाठी केंद्रीय आणि राज्यातील मंत्र्यांना मैदानात उतरण्याच्या सूचना भाजपा नेतृत्वाकडून करण्यात आल्या आहेत. त्यानुसार मंत्र्यांना जिल्ह्याचे प्रभारी म्हणून वाटप करण्यात आले आहे. जळगाव जिल्ह्याची जबाबदारी राज्याचे वस्त्रोद्योगमंत्री संजय सावकारे यांच्यावर सोपविण्यात आली आहे. तर आ. सुरेश भोळे यांची जळगाव शहर निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली असून आमदार मंगेश चव्हाण यांच्याकडे जळगाव पश्चिम आणि जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष नंदू महाजन यांच्याकडे जळगाव पूर्व (रावेर) चे निवडणूक प्रमुख म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
वादातीत नसलेल्या रक्षा खडसेंकडे नंदुरबार
जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथ खडसे आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यातील राजकीय युध्दात केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांची नेहमीच कोंडी होतांना दिसते. मात्र मंत्री रक्षा खडसे कुठल्याही वादात न पडता केंद्र सरकारच्या कार्यात समाधानी असल्याने त्यांच्याकडे नंदुरबार जिल्ह्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
आमदार भोळेच जळगावचे ‘पालक’
मागील आठवड्यात आमदार सुरेश भोळे यांचे राजकीय विरोधक असलेले डॉ. सुनील महाजन यांचा भाजपा प्रवेश झाला. आ. भोळेंना शह देण्यासाठीच हा प्रवेश झाल्याची चर्चा होती. मात्र महापालिका निवडणुकीचे नेतृत्व आमदार सुरेश भोळे यांच्याकडेच सोपविण्यात आल्याने शह देण्याच्या चर्चाना भाजपानेच पूर्णविराम दिला आहे. त्यामुळे निवडणुकीचे पालकत्व आ. भोळेंकडे राहणार आहे.
मंत्री महाजन नाशिकचे अघोषित पालकमंत्री
नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा पेच अद्यापही कायम आहे. शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भाजपा यांच्यात पालकमंत्री पदावरून नेहमीच शीतयुध्द रंगले आहे. मात्र मुख्यमंत्र्यांचे विश्वासू म्हणून मंत्री गिरीश महाजन यांना कुंभमेळा मंत्री आणि आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी प्रभारी म्हणून नेमून नाशिक जिल्ह्यावर प्रभाव कायम ठेवण्याचा प्रयत्न भाजपाने केला आहे.
नडणाऱ्या भागासाठी आमदार चव्हाणांची नियुक्ती
गिरणा पट्टा हा भाग भाजपासाठी नेहमीच डोईजड राहीला आहे. या भागात खासदार असले तरी मंगेश चव्हाण यांच्यारूपाने भाजपाचा एकच आमदार आहे. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांवर देखिल शिवसेनेचे प्राबल्य आहे. नडणाऱ्या भागासाठी भाजपाकडे आमदार मंगेश चव्हाण हे जालीम उपाय म्हणून आहे. गिरणा पट्ट्यात शिवसेनेच्या शिंदे गटाने स्वबळाची डरकाळी फोडल्याने या भागासाठी निवडणुकीचे नेतृत्व आमदार मंगेश चव्हाणांकडे सोपविण्यात आले आहे.
जळगाव जिल्ह्याचे नेतृत्व मंत्री सावकारेंकडे
जळगाव जिल्ह्यात एकेकाळी आमदार एकनाथराव खडसे यांचे भाजपात मोठे राजकीय वजन होते. त्यांनी भाजपाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर संकटमोचक असलेले तथा मंत्री गिरीश महाजन यांचा शब्द जिल्हा भाजपात प्रमाण मानला जातो. आता मात्र निवडणुकांच्या अनुषंगाने वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांची प्रभारी म्हणून नियुक्ती करून त्यांना ताकद दिली जात असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता मंत्री संजय सावकारे यांच्या नेतृत्वाखाली लढविल्या जाणार असल्याने त्यांचा शब्द हा प्रमाण ठरणार आहे.









