नंदुरबारच्या खापरमध्ये भाजपला खिंडार; ग्रामपंचायत सदस्यांसह अनेक कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश…!

---Advertisement---

 

नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील खापरमध्ये राजकीय पटलावर महत्त्वपूर्ण घडामोड घडली असून, भाजपला मोठा धक्का दिला असून विद्यमान ग्रामपंचायत सदस्यांसह अनेक कार्यकर्त्यांनी शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. कोयलीविहिर येथे नुकत्याच पार पडलेल्या कार्यक्रमात हा प्रवेश सोहळा आमदार आमश्या पाडवी यांच्या हस्ते उत्साहात पार पडला.

गेल्या काही काळात खापर परिसरात विकासकामांवरून आणि स्थानिक पातळीवरील राजकीय हालचालींवरून चर्चा सुरू होत्या. अशा परिस्थितीत ग्रामपंचायत सदस्यांसह कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने पक्षांतर केल्याने स्थानिक राजकारणात नव्या समीकरणांची सुरुवात झाल्याचे मानले जात आहे.

यात ग्रामपंचायत सदस्य आशा विनायक पाडवी यांच्यासह विनायक पाडवी (सामाजिक कार्यकर्ता), धनराज पवार, अमर वसावे (अध्यक्ष, पेसा समिती), अमर शेगजी वसावे (सामाजिक कार्यकर्ता), किशन वसावे, फत्तेसिंग पाडवी, अनिल पाडवी, भरतसिंग वळवी, चेतन पाडवी, अरविंद वळवी, गणेश वळवी, विशाल पाडवी, पारस पाडवी, प्रल्हाद पाडवी, नरेश पाडवी, रवींद्र वसावे, मनोज ब्राह्मणे, अनिल वसावे, राहुल पाडवी, पिंट्या पाडवी, जसपाल वसावे, संदीप वसावे, मोगेश पाडवी अशा अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेचा झेंडा हाती घेतला.

प्रवेशकर्त्यांनी यावेळी आमदार आमश्या पाडवी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या विकासकामांमुळे प्रेरित होऊन हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले. स्थानिक पातळीवरील रस्ते, पाणीपुरवठा, तसेच विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी यामुळे जनतेत सकारात्मक वातावरण निर्माण झाल्याचे त्यांनी नमूद केले. शिवाय,जनतेच्या समस्या तत्काळ सोडविण्याची भूमिका आणि कार्यकर्त्यांशी सातत्याने संपर्क ठेवण्याची शैली यामुळे शिवसेनेकडे आकर्षक झाल्याचे सांगितले.

दरम्यान, या सामूहिक प्रवेशामुळे खापर ग्रामपंचायतीतील राजकीय समतोल ढासळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भाजपच्या गटात निर्माण झालेली पोकळी आणि शिवसेनेला मिळालेली नव्याने बळकटी यामुळे आगामी काळात स्थानिक राजकारण अधिकच रंगतदार होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. विशेषतः गावपातळीपासून तालुकास्तरापर्यंत या बदलाचा प्रभाव जाणवण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होताना दिसत आहे.

येत्या काळात आणखी काही कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याचेही समोर आलं आहे. त्यामुळे खापर परिसरात पक्षांतराची ही लाट कायम राहण्याची शक्यता असून, राजकीय वातावरण अधिकच तापण्याची चिन्हे दिसत आहेत.

खापर आणि परिसरातील या मोठ्या राजकीय घडामोडींचा थेट परिणाम आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांवर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ग्रामपंचायत स्तरावरील नेतृत्व बदल आणि कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणावर झालेला ओघ लक्षात घेता, शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढण्यास मदत होणार आहे. विशेषतः आदिवासी भागात निर्माण झालेला नवीन राजकीय कल आणि स्थानिक नेत्यांवरील विश्वास यामुळे पारंपरिक मतदारसंघातील समीकरणे बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही. परिणामी, जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये अनपेक्षित निकाल लागण्याची शक्यता असून, सर्वच पक्षांना नव्याने रणनीती आखावी लागणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---