---Advertisement---
जळगाव : आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाकडून संघटनात बांधणीचे काम सुरू आहे. महापालिका निवडणुकीत भाजपा विरोधकांची मोट बांधून ठाकरे गट निवडणुकीच्या मैदाना उतरणार असल्याची माहिती माजी खा. उन्मेश पाटील यांनी दिली. दरम्यान भाजपाच्या मनात भिती असल्यानेच निवडणुका लांबणीवर टाकल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले.
शिवसेना उध्दव ठाकरे गटाच्या महानगर, जळगाव ग्रामीण आणि तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक शिवसेना कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधतांना ते बोलत होते. माजी खा. उन्मेश पाटील यांनी सांगितले की, शिवसेना ठाकरे गटाने तयार केलेल्या समितीकडून प्रभागनिहाय आढावा घेतला जात आहे. प्रभागातील इच्छुकांची यादी तयार करून घेतली जात आहे. तसेच जिल्हा परिषद आणि नगरपरिषदांच्या निवडणुकांसाठी संघटना बांधणीवर जोर दिला जात आहे.
---Advertisement---
पक्ष फोडण्याचा खटाटोप कशासाठी ?
राज्यात आणि केंद्रात भाजपाची सत्ता आहे. जळगाव जिल्ह्यात देखिल भाजपा मजबूत आहे. तरी देखिल शरद पवार गट, ठाकरे गटातील कार्यकर्त्यांना प्रवेश दिला जात आहे. संघटना मजबूत आहे तर मग पक्ष फोडण्याचा खटाटोप कशासाठी? असा सवाल करीत भाजपाने स्वत:चे घर सांभाळावे असा टोला उन्मेश पाटील यांनी लगावला.
विश्वास नसल्याने निवडणूका लांबणीवर
सत्ताधारी भाजपाच्या मनात भिती असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर टाकल्या जात असल्याची टीका उन्मेश पाटील यांनी केली. तसेच जिल्ह्यात चार मंत्री असतांनाही निम्न तापी प्रकल्प, सात बलून बंधारे यांना अद्यापही सरकारकडून निधी मिळत नाही ही शोकांतिका असल्याचेही ते म्हणाले.
यांची होती उपस्थिती
बैठकीला जिल्हाप्रमुख कुलभूषण पाटील, माजी विरोधी पक्षनेते सुनील महाजन, महानगर प्रमुख शरद तायडे, माजी नगरसेवक खालिद बागवान, जळगाव ग्रामीण चे विधानसभा क्षेत्र प्रमुख रमेश पाटील, अल्पसंख्यांक आघाडी महानगर प्रमुख जाकिर पठाण, युवासेना जिल्हाप्रमुख पीयुष गांधी, मनिषा पाटील, गायत्री सोनवणे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचालन उप जिल्हाप्रमुख भाऊसाहेब सोनवणे यांनी तर आभार उमेश चौधरी यांनी मानले.